कोरोना मृत्यू आकडेवारीसाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयांना नोटिसा

… तसेच माहिती अद्ययावत करण्याचे नोडल अधिकाऱ्यांना प्रशासनाचे पत्रही देण्यात आले आहे.

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू आणि कोरोनामुक्त रुग्णांची माहिती अद्यावत करण्यासाठी खासगी रुग्णालयांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोडल अधिकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देत महिती अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहे. मृतांची आकडेवारी पोर्टलवर अपडेट घेण्यात येत असून दोन दिवसांत जिल्ह्यातील बाधित मृत्यू नोंद करण्यासाठी मुदत दिलेली आहे. यंत्रणांना पत्राद्वारे अवगत करण्यात आले असून विलंब करणाऱ्या आस्थापना व प्रमुखांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या पहिल्या लाटेच्या पाचपट वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर भार आला. दुसऱ्या लाटेच्या कालावधीत वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालये रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त होते. प्रयोगशाळा चाचण्या करण्यासाठी व्यस्त होत्या.

माहिती संकलन व अद्ययावतीकरण यांच्यापेक्षा रुग्णांच्या उपचारावर भर देणे हा त्यांच्या प्राधान्यक्रमाचा भाग होता. रुग्णालयात व प्रयोगशाळेत कामकाज करणारे बरेचसे मनुष्यबळ बाधित झाल्याने अडचण निर्माण झाली होती. फॅसिलिटी अॅप प्रत्येक रुग्णालयाला देण्यात आले आहे. त्यावर रुग्णाचा मृत्यू अद्ययावत करणे ही रुग्णालयाची जबाबदारी अाहे. अॅपवर माहिती भरल्यानंतर पोर्टलवर मृत्यूचा आकडा अपडेट होतो आणि पोर्टलवर अपडेट झालेले मृत्यूच प्रशासनास आणि माध्यमांना कळवण्यात येतो. इंटरनेट कनेक्टिव्हिटी व तत्सम बाबी विलंबासाठी कारणीभूत ठरल्या अाहेत, अशी माहिती डॉ. अनंत पवार यांनी दिली. रुग्ण पोर्टलवर नोंदणी न झाल्याने फॅसिलिटी अॅपवर नोंदणीकरण रखडले.