नाशिकमध्ये पुन्हा लॉकडाऊन नाहीच- पालकमंत्री छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती !

नाशिक (प्रतिनिधी): नागरिकांना चरितार्थ चालविण्यासाठी पैसा कमविणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांची मागणी असली तरीही आम्ही पुन्हा लॉकडाऊन करणार नाही असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

आज (दि.१७ जून) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गाच्या नियंत्रणा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे,  आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले,  “शहरातील रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि  ती वाढणार आहे त्यासाठी घाबरून जाण्याचे कारण नाही. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ती वाढून नियंत्रणात येते.  याचे मालेगाव हे यशस्वी उदाहरण आहे. आपल्या जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा ही आपली जबाबदारी असून त्यासाठी प्रत्येकाने सर्वस्व पणाला लावून जे काही करता येईल ते केले पाहिजे. शासनाकडून जिल्ह्याला कोरोना आपत्तीच्या नियंत्रणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.” भविष्यातील वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्टींग लॅब सुरू करण्यात यावी असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात असेही त्यांनी सांगितले.