विनामास्क ५१३ नागरिकांना ठोठावला एकूण १ लाखाचा दंड

नाशिक शहरात नियम मोडणाऱ्या एकूण ५१३ नागरिकांकडून एकूण १ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने शनिवार-रविवार पूर्ण लॉकडाऊन केले असून शहरातील १३ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत विनामास्क फिरणाऱ्या ५१३ नागरिकांना १ लाख ३ हजारांचा दंड करण्यात आला. १६० नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट केली असता ५ नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा आणि मनपा प्रशासनाने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. खुद्द पोलिस आयुक्त दीपक पांडेय आणि मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी परिसरात पायी गस्त करून नागरिकांना मास्क वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.

या खबरदारीमुळे शहरात काही प्रमाणात नागरिक नियमांचे पालन करताना दिसून येत आहे. तरी देखील विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे.या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. इतकेच नाही तर या सुपर स्प्रेडर नागरिकांना पकडून त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येऊन कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.