अशोका बिल्डकॉन: 10 स्वॅब टेस्टिंग कक्ष, आर्ट ऑफ लिव्हींगमार्फत 140 पीपीई किट्स

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत शंभर सॅनिटायझर कॅनची मदत

नाशिक(प्रतिनिधी) : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार लक्षात घेता कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेकरिता अहोरात्र तैनात असलेल्या डॉक्टरांसाठी व आरोग्य कर्मचारी यांचा विचार करुन मालेगांव येथील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी अशोका बिल्डकॉनमार्फत देण्यात आलेल्या 10 स्वॅब तपासणी कक्ष,  आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे 140 पीपीइ किटस व राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध विभागांसाठी  5 लिटर याप्रमाणे 100 सॅनिटायझर कॅन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, अशोका बिल्डकॉनमार्फत देण्यात आलेल्या 10 स्वॅब तपासणी  कक्षांपैकी  6 कक्ष मालेगांव येथे व 4 कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिकसाठी देण्यात आलेले आहेत. या स्वॅब तपासणी कक्षामुळे कोरोना संशयित रुग्णाचे स्वॅब नमुने सुरक्षितरित्या घेणे हे डॉक्टरांसाठी सहज शक्य होणार असल्याने हे कक्ष अत्यंत उपयुक्त आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत देण्यात आलेल्या प्रत्येकी 5 लिटरच्या 100 कॅन पैकी 20 कॅन मालेगांव येथील विविध विभागांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे  जिल्हाधिकारी  यांनी  सांगितले. कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, औद्योगिक आस्थापना मदतीसाठी पुढे येत असुन स्वॅब तपासणी कक्षासाठी अशोक कटारिया यांचे सहकार्य लाभले आहे, असे मत जिल्हाधिकारी  यांनी  व्यक्त केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, आर्ट ऑफ लिव्हींगचे विजय हाके व राहूल पाटील उपस्थित होते.