नाशिकमध्ये कोरोनाचे स्वाब तपासणीसाठी शासकीय लॅब सुरु

नाशिक (प्रतिनिधी): कोरानाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता स्वाब घेतल्यानंतर अहवाल तत्काळ प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यामध्ये प्रयोगशाळा अधिक वाढवणे विचाराधीन होते. त्यादृष्टीने खासदार हेमंत गोडसे यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या शासकीय कोरोना टेस्टींग लॅबच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी दोनशे अहवाल मिळणार असून भविष्यात अहवाल मिळण्याचे प्रमाणही वाढणार असल्याचे मत, अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

खासदार हेमंत गोडसे यांच्या एक कोटी रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या शासकीय कोरोना टेस्टींग लॅबचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ.भारती पवार, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राजाराम माने, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बरसोड, आरोग्य उपसंचालक मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.अनंत पवार उपस्थित होते.

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, जिल्हा रुग्णालय येथे सुरु करण्यात आलेल्या टेस्टींग लॅबमुळे तत्काळ कोरोना रुग्णांचे नमुने तपासणीची सोय होणार आहे. लॅबसाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत व या लॅब चे कामकाज लवकरच सुरू होईल. अतिशय किमान कालावधीमध्ये जिल्हा रुग्णालय व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या अद्ययावत लॅबचे निर्माण केले आहे. टेस्टींग लॅबचा उपयोग कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर इतरही साथीच्या आजारांच्या निदानासाठी कायमस्वरुपी होणार आहे.