नाशिकच्या गिर्यारोहकाने घेतला अप्रकाशित किल्ल्याचा शोध

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधील गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी धुळे जिल्ह्यातील लळिंग किल्ल्याच्या पर्वतरांगेतील अप्रकाशित ‘रामगड’ किल्ल्याचा शोध घेतला आहे. धुळे तालुक्यातील सडगाव येथे असणारा रामगड हा केवळ धार्मिक डोंगर नसुन तो एक गिरीदुर्ग आहे हे शोधमोहिम घेऊन प्रकाशात आणले आहे.

काही वर्षांपूर्वी लळींग किल्ल्याच्या भटकंती दरम्यान याच पर्वतरांगेत एक धार्मिक डोंगर असून त्यावर पाणी आहे अशी जुजबी माहिती स्थानिक माणसांकडून मिळाली होती. त्यानंतर सुदर्शन कुलथे यांनी नकाशे, प्रत्यक्ष भेट आणि अधिक अभ्यास करून या डोंगराचे नाव रामगड असून हा किल्ला असल्याचे निदर्शनास आणून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या यादीमध्ये एका किल्ल्याची भर घातली आहे.

रामगडाचे भौगोलिक स्थान 20.795850 N, 74.647155 E असे आहे. धुळे शहराला लागून असलेल्या लळिंग किल्ल्यापासून पश्चिमेकडे 11 कि.मी. अंतरावर असलेले सडगाव किंवा हेंकळवाडी ही रामगड किल्ल्याच्या पायथ्याची गावे आहेत. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मालेगावहून करंजगव्हाण – दहिदी – अंजनाळे – सडगाव असा देखिल मार्ग आहे. किल्ल्याची समुद्रसपाटी पासून उंची 1960 फूट (597 मी.) असून किल्ला चढाईला सोप्या श्रेणीतला असून अगदी अर्धा तासात गडमाथा गाठता येतो.

रामगडाच्या खालच्या टप्प्यावर तसेच गडाच्या सर्वोच्च ठिकाणी पीराचे स्थान आहे. रामगडावर तीन खडक खोदीव पाण्याची टाकी आहेत. पैकी दक्षिणेकडे 16 फूट लांब आणि 16 रूंद असे भले मोठे कातळात खोदलेले पाण्याचे टाके आहे. उत्तरेकडे दुसरे पाण्याचे खोदीव टाके आहे. हे 24 फूट लांब तर 8.5 फूट रूंद आहे. हे सुमारे 7 फूट खोल असून त्यातील पाणी पिण्याजोगे आहे.

गडमाथ्यावरील पश्चिम दिशेला पाण्याचे तिसरे खोदीव टाके आहे. परंतु हे टाके सहजपणे दृष्टीस येत नाही. हे टाके अतिशय तीव्र उतारावर खोदलेले असूनटाक्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि टाक्यातील पाणी काढण्यासाठी सावधानतेने हालचाली कराव्या लागतात. हे टाके 16 फूट लांब, 8.5 फूट रूंद तर सुमारे 6 ते 7 फूट खोल असून पाणी पिण्याजोगे आहे. यातिन्ही टाक्यांच्या काठावर गोलाकार कोरीव खड्डे दिसून येतात.

उत्तरेकडे गडमाथ्याच्या सर्वोच्च बिंदूवर दगड रचलेले प्रमुख जोते आढळते. या जोत्यात एका पीरबाबाचे स्थान आहे. गडमाथा आणि परिसरात आपट्याची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात.

रामगडावर असणारे प्राचीन पाण्याची खोदीव टाकी, माथ्यावरील जोती यावरून हा एक किल्ला आहे असे दिसून येते. लळिंग पर्वतरांग पूर्व ते पश्चिम पसरलेली आहे. लळिंग रांगेच्या पूर्व टोकावर लळिंग किल्ला आहे तर पश्चिम टोकावर रामगड आहे.रामगडाचे स्थान लक्षात घेतले तर तो बरोबर लळिंग किल्ला आणि गाळणा किल्ला यांच्या मध्यभागी आहे.

रामगडापासून सरळ रेषेत अंतर मोजले तर लळिंग 10 कि.मी. तर गाळणा 12 कि.मी. अंतरावर आहे.रामगडाच्या माथ्यावरून कुठल्याही अडथळ्याविना लळिंग आणि गाळणा दोन्ही किल्ले नजरेच्या टप्प्यात येतात. त्यामुळे हे या दोन्ही किल्ल्यामध्ये लक्ष ठेवण्यासाठीचे चौकीचे ठिकाणी असावे.