कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा महत्वाचा निर्णय

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील कोरोनाच्या वैद्यकीय व्यवस्थापनासाठी आता स्वतंत्र इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर कार्यान्वित करण्यात येत असून सर्व यंत्रणांच्या समन्वयातून साकारलेल्या या सेंटरच्या माध्यमातून कोरोना संसर्ग व  आरोग्य सेवांच्या संचलन व  सनियंत्रणाबरोबरच त्यासाठीचा ॲक्शन प्लान तयार केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

यासंदर्भात आज जिल्ह्यातील प्रमुख आरोग्या यंत्रणांमधील अधिकारी व डॉक्टर्स यांची यासंदर्भात एक बैठक आयोजित करून त्यांच्या सूचना विचारात घेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, आजपर्यंत कोरोना व्यवस्थापनात आपल्या जिल्ह्यांत झालेले कामकाज, सांख्यिक माहिती सुव्यवस्थितरित्या पोर्टलवर भरली जाणे, कोरोना व्यवस्थापनाचे जे विशिष्ट घटक आहेत त्यांचा आढावा घेवून त्याची जबाबदारी विशिष्ट अधिकाऱ्यांवर कशा प्रकारे देता येईल , जेणेकरून त्यांना त्याचा आवाका येईल व ते त्यांचे काम व्यवस्थितरित्या करू शकतील. तसेच या सर्वांवर नियंत्रणासाठीची व्यवस्था कशा प्रकारची असेल यासाठीच्या अनेक विषयांचा आज आढावा घेण्यात आला.

प्रामुख्याने महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी प्रभावीरित्या करणे. त्यात जे हॉस्पिटल या जनआरोग्य योजनेशी संबंधीत आहेत, कोविड हॉस्पिटलमध्ये समाविष्ट करणे. कोविड हॉस्पिटल म्हणू घोषित केलेल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करणे. तसेच आयसीयु चे व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे, त्यात सिनियर्स डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्स, व्हाट्स ॲप ग्रुप, ऑडियो कॉल्सच्या माध्यमातून चर्चा सतत चालू ठेवणे व पोर्टलवर वेळेत सतत माहिती भरणे, त्यासाठी विशिष्ट लोकांवर ती जबाबदारी सोपवणे व मॅसेजेसच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.

लॅबरोटरीमधून २४ तासाच्या आत अहवाल मिळतील व तीनही लॅबला योग्य प्रमाणात सॅंपल्स पाठवले जातील. तसेच तेथून वेळेत रिपोर्ट प्राप्त करून जलद गतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी . मांढरे यांनी सांगितले की, जुन्या बैठकांमधील झालेल्या निर्णयांचे पूर्तता अहवाल वेळेत प्राप्त करून घेणे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी आजाराच्या हताळणीबाबत ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यात प्रामुख्याने आजाराची हताळणी, त्याचे व्यवस्थापन, औषोधोपचार या सर्वांची अंमलबजावणी होतेय का नाही याबातही सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करण्याची गरज आहे.

खाजगी रुग्णालयांचा वापर आता कोविड च्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर होतो आहे. त्या नियमित रूग्णालयांवरती निगराणी ठेवण्यात यावी. तेथील पेशंटला उपचारासाठीचे दर वाजवी आकारले जात आहेत का, त्याला उपचार योग्य पद्धतीने दिले जात आहेत किंवा कसे याची नियमितपणे पाहणी करणे, त्याबद्दल काही तक्रारी असतील तर त्यावर देखील तक्रार नियंत्रणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. पेशंटच्या मॅनेजमेंटच्या दृष्टिने तो योग्य ठिकाणीच म्हणजे सीसीसी, डीएचसी, तसेच आवश्यकता असेल तरच हॉस्पिटमध्ये त्याला पाठवण्यासाठी वेळेवर निर्णय घेणे व त्याप्रमाणे त्या ठिकाणीच तो पेशंट जाईल याची काळजी घेण्याच्या व त्यासठीचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत, असे मांढरे यांनी सांगितले.

तसेच या त्रिस्तरीय रचनेच्या उपचारपद्धतीत सर्व वैद्यकीय साधने, उपकरणे, कर्मचारी वेळेवर मिळताहेत  किंवा कसे यावरही निगराणी ठेवण्यात येणार असून त्यात प्रत्येक स्तरावर तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्यात येणार असून प्रसारमाध्यमांना वेळेवर माहिती मिळतेय का हे पाहण्यासाठी एक व्यवस्था निर्माण केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोविड साठी निधी उपलब्ध केली गेलाय, संभाव्य परिस्थितीचा  अंदाज घेवून कोरोना साठीची खरेदी तातडीने करणेसाठी स्वतंत्र व्यवस्थाही स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड उपचारासोबत इतर आजारांवरील सार्वजनिक उपचारही त्यासोबतच तातडीने सामान्य रुग्णालयातून दिले जाण्यासाठीचे व्यवस्थापन, पावसाळ्यातील संभाव्य आजारांवरील उपचार व्यवस्थापन योग्य राहील यासाठीचे नियोजन तसेच सर्व स्तरावरील आरोग्य यंत्रणांना वेळेत कर्मचारी मिळतील त्यासाठी कंत्राटी पद्धतीने व इतर जिल्ह्यातून प्रतिनियुक्तीवर मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल यासाठीचेही नियोजन करण्यात आले आहे.

त्याचबरोबर बायोमेडिकल्स वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठीचे नियंत्रण ठेवणे व सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा, शस्त्रक्रियांचे व्यवस्थापन करणे यासाठीच्या व्यापक व्यवस्थापनासाठी सदैव समर्पित व सतर्क टीम कार्यान्वित राहतील त्यावरही वारंवार नियंत्रण व निरीक्षण केले ठेवले जाईल. त्यांचे वेळोवेळी कार्य अहवालांचे मुल्यमापन करण्यासाठी आठवड्यातून एकदा बैठक घेवून जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त स्तरावर घेण्यात येईल व त्यातून सर्व विभागांचा समन्वय निट राहील, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.