नाशिक: आरोपीला भेटण्यास आलेल्या बहिणीला पोलिसांची मारहाण; भेटण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप

नाशिक: जिल्हा रुग्णालयातील “प्रिझनर वार्ड” म्हणजे गुन्हेगारांचं आवडीचं ठिकाण. त्यांच्यासाठी हे जणू वेलनेस सेंटरच ! याच प्रिझनर वार्डमध्ये आरोपीला भेटण्यास आलेल्या बहिणीकडे पैशांची मागणी करत तिला शिविगाळ आणि मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. १) घडला. याबाबत आरोपीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून संदीप भाबड या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, या महिलेचा भाऊ एका गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला पोटाचा अल्सर सल्याने त्यास जिल्हा रुग्णालयातील प्रिझनर वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. पीडिता पुणे येथून नाशिकला भावाला भेटण्यास आली होती. दुपारी ती जिल्हा रुग्णालयात आली. प्रिझनर वार्ड येथे ड्युटीवरील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना तिने भावाला भेटण्याची विनंती केली. मात्र दोघांनी तिला हाकलून दिले.

याच वाॅर्डचे गार्ड असलेले संशयित कर्मचारी संदीप भाबड येथे आले. त्यांनी महिलेला भावाला भेटू देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. महिलेने नकार दिला असता तिला शिविगाळ केली. पीडितेने मोबाइलवर पोलिसांच्या १०० नंबरवर काॅल करण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने कुंडी फेकून मारली. सुदैवाने कुंडी महिलेला लागली नाही. आई आणि लहान मुलीसह पीडित महिलेने टिबी वॉर्डमध्ये आश्रय घेतला. काही वेळाने सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत संशयिताच्या विरोधात तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित भाबडला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.