ट्रक चालकास मारहाण; केली १ कोटीची जबरी चोरी !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील इंदिरानगर परिसरातील जॉगिंग ट्रॅक जवळ एका ट्रक चालकास ४ अज्ञात इसमांनी संगनमत करून बेदम मारहाण केली. दरम्यान, ट्रकमधील एकूण १ कोटी ४३ लाख ३८ हजार ६१० रुपये किमतीचा मुद्देमाल व ट्रक असे घेऊन अज्ञातांनी पोबारा केला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगदीश संपत बोरकर (वय ३७) हा राजवाडा विल्होळी येथील रहिवाशी आहे. (दि.१९ जानेवारी) रोजी रात्री इंदिरानगर परिसरातील जॉगिंग ट्रॅक जवळ फिर्यादी ट्रक घेऊन जात होता. दरम्यान, ४ अज्ञात इसमांनी ट्रक चालकास थांबवून त्यास ट्रकमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर, ट्रकमधील विदेशी मद्याचे बॉक्स व फिर्यादीचा ट्रक (एम.एच. ४८ बी.एम.१६१०) घेऊन जाऊन जबरी चोरी केली.