नाशिककरांनो बुधवारपासून स्मार्ट पार्किंग “गो लाईव्ह” होणार !

बुधवार म्हणजेच ४ मार्च २०२० पासून स्मार्ट पार्किंगसाठी पैसे भरावे लागणार आहेत !

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली १५ ठिकाणांची स्मार्ट पार्किंग बुधवार ४ मार्च २०२० पासून प्रायोगीक गो लाईव्ह होणार आहे. स्मार्ट पार्किंगचे शुल्क दुचाकी गाडी साठी ५ रुपये प्रतितास तर चार चाकी गाडी साठी १० रुपये प्रतितास असे आकारण्यात येणार आहे.

नाशिक शहरात वाहतुकीचा आणि पार्किंगचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे शहरामध्ये ह्या पार्किंगची गरज लक्षात घेता नाशिक महानगर पालिका व नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत स्मार्ट पार्किंग संकल्पना समोर आणली गेली.. त्यासाठी शहरातील ३३ ठिकाणांचा अभ्यास करण्यात आला आणि २८ ठिकाणी ऑन स्ट्रीट आणि ५ ठिकाणी ऑफ स्ट्रीट पार्किंग व्यवस्था राबवण्यात येत आहे.

स्मार्ट पार्किंगचा आराखडा बनवताना वर्दळीच्या ठिकाणी, “पीक अवर्स”मध्ये होणारी गर्दी आणि “नो हॉकर्स झोन” या सर्वांचा अभ्यास करूनच आराखडा बनवण्यात आला. सध्या शहरात १५ ठिकाणी स्मार्ट पार्किंग राबविली जात आहे. त्यात १३ ठिकाणी ऑन स्ट्रीट व २ ठिकाणी ऑफ स्ट्रीट स्मार्ट पार्किंग असणार आहे.

जाणून घ्या कुठली आहेत ही ठिकाणं (ऑन स्ट्रीट लोकेशन्स)

 • कुलकर्णी गार्डनजवळील साधू वासवानी रोड
 • कुलकर्णी गार्डन ते बीएसएनएल शरणपूर रोड
 • ज्योती स्टोअर्स, ऋषीकेश हॉस्पिटल ते गंगापूर नाका
 • प्रमोद महाजन गार्डन प्रवेशद्वार (इंद्रप्रस्थ हॉलसमोर)
 • गंगापूर नाका ते जेहान सर्कल, गंगापूर रोड
 • जेहान सर्कल ते गुजराथी हॉस्पिटल, गंगापूर रोड
 • जेहान सर्कल ते एबीबी सर्कल
 • गुरुजी हॉस्पिटल ते पाईपलाईन रोड
 • मोडक पोइन्ट ते खडकाळी रोड, जनरल पोस्ट ऑफिस
 • थत्ते नगर रोड, कॉलेज रोड
 • श्रद्धा पेट्रोल पंप ते वेस्टसाईड कॉलेज रोड
 • कॅनडा कॉर्नर ते विसे मळा
 • शालिमार ते नेहरू गार्डन

ऑफ स्ट्रीट लोकेशन्स

 • बीडी भालेकर हायस्कूल मैदान, शालीमार
 • अण्णाशास्त्री हॉस्पिटल, मेन रोड

“गो लाईव्ह” म्हणजे नक्की काय ?

ह्या १५ ठिकाणी प्रायोगीक तत्त्वावर स्मार्ट पार्किंग व्यवस्था राबवण्यात येणार आहे.. ४ मार्च २०२० पासून प्रायोगिक गो लाईव्ह होणार आहे. स्मार्ट पार्किंग जेथे जेथे आहे तेथे तेथे चार चाकी वाहना करिता सेंसर्स लावण्यात आले आहेत. म्हणजे काय, तर कोणतीही चार चाकी गाडी स्मार्ट पार्किंगमध्ये उभी केली की ती सेंसर डीटेक्ट करेल. याद्वारे स्मार्ट पार्किंगची जी कंट्रोल रूम आहे तेथे कोणत्या वेळेला किती वाहनं स्मार्ट पार्किंगमध्ये उभी आहेत याचा डाटा तयार होईल. हा डाटा भविष्यात नियोजनासाठी उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांना घरबसल्या सुद्धा पार्किंगसाठी जागेची निवड करता येणार आहे.

पार्किंग ॲट फिंगरटीप

“पार्किंग ॲट फिंगरटीप” म्हणजेच घरबसल्या पार्किंगसाठी जागेची निवड करता येणार आहे. स्मार्ट पार्किंग म्हणजेच एखाद्या वेळी आपण घरातून निघाल्यानंतर निश्चितस्थळी जाऊन वाहन पार्क करणे आवश्यक असते. अशावेळी पार्किंगसाठी जागा शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा घरातच तुम्हाला मोबाईलवर फ्री लोकेशन समजेल आणि पार्किंगसाठी जागा बुक करता येईल. तर यासाठी गुगल प्ले स्टोअरला किंवा आयओएस वरून “नाशिक स्मार्ट पार्किंग” हे अँप डाऊनलोड करून ते ऑपरेट करता येणार आहे.