नाशिक स्मार्टसिटी प्रकल्पाचे काम कोणामुळे रखडले ?

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील स्मार्टसिटी प्रकल्पाचे काम अवघ्या ४ वर्षांपासून रखडले आहे. याला सर्वस्वी जबाबदार स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल असून, त्यांच्या बेजबाबदार कामाच्या पद्धतीमुळे स्मार्टसिटी प्रकल्पाचा शहरात बोजवारा उडाला आहे, थविल परस्पर निर्णय घेऊन ठेकेदारांना अभय देत असल्याने त्यांची लवकरात लवकर बदली करावी. अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी शासनाकडे केली आहे.

प्रकाश थविल यांचा मनमानी कारभार थांबण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. पत्राद्वारे कुलकर्णी यांनी स्मार्ट प्रकल्पाच्या विलंबाचा समाचार घेतला. त्याचप्रमाणे स्मार्टसिटी कंपनीमुळे नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, प्रकल्पाची अवस्था व संथगतीने चालणारे काम बघून नाशिककरांचा अपेक्षाभंग झाला आहे. अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या स्मार्ट रस्त्याचे काम पूर्ण होण्याची मुदत ६ महिने असतांना देखील अवघे पावणेतीन वर्ष लोटूनही अद्याप काम रखडले आहे. तसेच संचालकाची परवानगी न घेता थविल यांनी परस्पर कामाला मुदतवाढ दिली. तर दुसऱ्या बाजूला काम अपूर्ण असून देखील रयडिंग क्वालिटीसाठी  पुन्हा ३ कोटी रुपये खर्चाचा घाट घातला.

एवढ्यावरच न थांबता परस्पर संबंधित ठेकेदाराला ८० लाखांच्या दंडात्मक कारवाईतून मुक्त करत माफी दिली. त्याचप्रमाणे वीजदाहिनीच्या कामाचा दर्जा अत्यंत निष्कृष्ट आहे. थविल यांनी पार्किंगसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर न करताच परवानगी नाकारल्याची चुकीची माहिती दिली. तसेच ते संचालकांच्या बैठकीत देखील दिशाभूल करणारी चुकीची माहिती पुरवतात. तर गोदावरी रिव्हर फ्रंट प्रकल्प अजूनही सुरुवात करण्याच्या मार्गावर नाही. त्यामुळे स्मार्टसिटी प्रकल्प अंतर्गत सुरु असलेल्या कोट्यावधींच्या रखडलेल्या कामांना प्रकाश थविल हेच जबाबदार आहेत. ऑगस्टमध्ये बदली झालेली असतांना देखील अद्याप त्यांनी पदभार सोडलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी चौकशी करून, बदली करावी अशी मागणी महापौर कुलकर्णी यांनी केली आहे.