नाशिकमध्ये 80 वर्षांच्या आजोबांनी केलं 68 वर्षांच्या आजीशी लग्न !

‘अगंबाई सासूबाई’ ही टीव्ही मालिका सध्या  चांगलीच गाजतेय.. या मालिकेचं कथानक नाशिकमध्ये प्रत्यक्षात उतरवलंय नाशिकच्या आजी आजोबांनी. सिन्नर तालुक्यात हिवरे गावी 80 वर्षांच्या आजोबांनी 68 वर्षांच्या आजीशी विवाहगाठ बांधली.

ऐंशी वर्षांचे नवरदेव निवृत्ती रुपवते आणि सत्तरीकडे झुकलेल्या सुमनबाई पवार यांचा अनोखा विवाह सोहळा पाहण्यासाठी शेकडो वऱ्हाडींनी हजेरी लावली होती. ज्येष्ठ नागरिकांच्या या विवाहसोहळ्यासाठी निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. पत्रिकेवरील वाक्यं वर्तमानाची जाण करुन देणारी होती.

काय लिहिलं होतं पत्रिकेत..

आम्ही ज्येष्ठ नागरिक आमच्या जीवनाच्या सायंकाळी परस्परांना आधार देण्यासाठी आणि भविष्यकालीन जीवन समृद्ध करण्यासाठी… परस्परांचे स्वप्न, प्रेरणा आणि इच्छापूर्ततेसाठी उभयतांच्या संमतीने विवाहबद्ध होत आहोत. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद सोबत घेऊनच या अनोख्या नाविन्यपूर्ण जीवनात आम्ही समस्त समाज बांधवांच्या शुभेच्छा आणि समाजमान्यता मिळविण्यासाठी विवाहबद्ध होत आहोत.

‘संयोजकांचा चतुर खेळ, पूर्वपुण्याईचा घातला मेळ, कार्यवाहका शक्ति देई, मंगल कार्य तडीस नेई’ अशा वाक्यांमुळे निमंत्रण पत्रिका खरोखरच वाचनीय ठरली.

निवृत्ती रुपवते यांना एक मुलगा आहे. मात्र दहा वर्षांपासून तो बेपत्ता आहे. तर सुमनबाई यांना दोन मुली. आयुष्याच्या उतारवयात दोघं एकटे असल्याने ओळखीच्या लोकांनी चर्चा घडवून आणली. 16 फेब्रुवारीला हा लग्नसोहळा पार पडला. हा विवाह सोहळा जुळवून आणण्यात सुमनबाई यांचे पुतणे चंद्रकांत पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. केवळ पुढारलेले विचार न करता ते वास्तवात आणण गरजेचे असल्याचं पवार यांनी सांगितलं.

या लग्न सोहळ्याला सुमनबाई यांच्या दोन्ही मुली आणि नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. लग्नाला कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी निमंत्रण पत्रिका सुद्धा छापण्यात आल्या. उतारवयात वृद्धाश्रमांमध्ये एकटे जीवन व्यतीत करण्यापेक्षा असा पुनर्विवाह ही काळाची गरज बनत आहे.