सराफ बाजार मंगळवारीही सुरूच राहणार शनिवार व रविवार बंद

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नव्याने निर्बंध लावण्यात आले आहेत. या नव्या कोविड नियमावलीला दि नाशिक सराफ असोसिएशनने संपूर्ण प्रतिसाद देणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर सराफ बाजाराची मंगळवारची साप्ताहिक सुटी रद्द करून सोमवार ते शुक्रवार सलग पाच दिवस सराफ बाजार सुरू राहणार असून शासकीय नियमानुसार शनिवार आणि रविवार बाजार बंद राहणार आहे.

नव्या नियमावलीत शनिवार व रविवार दिवसभर व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्याचा नियम स्थानिक प्रशासनाने दिला आहे. त्यातच मंगळवारची साप्ताहिक सुटी अशा परिस्थितीत अाठवड्यातील तीन दिवस बाजार बंद राहिल्यास एकीकडे व्यावसायिकांना याचा आर्थिक फटका बसू शकतो तर दुसरीकडे ग्राहकांचीही ऐन लग्नसराईत सोने खरेदीसाठी गैरसोय होणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मंगळवारीही सराफ बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय नाशिक सराफ असोसिएशनने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष गिरीश नवसे, सेक्रेटरी किशोर वडनेरे, उपाध्यक्ष मेहुल थोरात यांनी दिली आहे.