नाशिक मनपात आजपासून पुषोत्सव

नाशिक : निसर्ग संवर्धनात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने गुरुवारपासून (दि. २०) पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन यंदाची फुलराणी अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते होणार आहे. अनेक वर्षांनंतर सुरू झालेल्या स्पर्धात्मक प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला असून, विविध गटातील स्पर्धांमध्ये तब्बल आठशे स्पर्धक सहभागी होणार आहेत. राजीव गांधी भवन येथे हे प्रदर्शन होणार आहे. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षतेखाली महापौर सतीश कुलकर्णी असतील. या पुष्पोत्सवात गुलाब पुष्पे, मोसमी फुले, कुंडीतील शोभिवंत वनस्पती, शालेय गटात फळे आणि भाजीपाला (कच्च्या भाज्यांची सजावट), कुंड्यांची सजावट, परिसर प्रतिकृती आणि तबक उद्यान या गटांमध्ये स्पर्धा होईल. येत्या रविवारपर्यंत हे पुष्पोत्सव प्रदर्शन सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

गुरुवारी (दि. २०) उद्घाटन सोहळ्यानंतर सायंकाळी सात वाजता लोकधारा, शुक्रवारी (दि.२२) सुगम संगीत, शनिवारी (दि. २२) भक्तिगीते असे कार्यक्रम होणार आहेत. रविवारी (दि. २३) सायंकाळी पाच वाजता उर्वरित पारितोषिक वितरण सोहळा होईल.

दरम्यान, महाशिवरात्रीचे औचित्य साधून बेल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात आरोग्यदायी बेल वृक्षांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शुक्र वारी महापालिका तीन हजार रोपांचे मोफत वितरण करणार आहे.फूल, फळांमध्ये प्रसिद्ध असलेले बरेच वृक्ष आहेत. पण, केवळ पानांसाठी ओळखले जाणारे थोडेच आहेत. त्यातील एक म्हणजे बेल वृक्ष. बेलात आरोग्यवर्धक गुण दडलेले आहेत. पोटदुखीपासून ते मधुमेहापर्यंतच्या सर्व समस्यांवर बेल गुणकारी आहे. उपचारात्मक फळ म्हणून बेलफळ ओळखले जाते. आयुर्वेदात त्यास महत्त्व प्राप्त झालेले आहे. अनेक आजारांवरील उपचारात त्याचा उपयोग केला जातो. गुणकारी झाडाची शहरात लागवड व्हावी, या उद्देशाने महानगरपालिकेच्या सहाही विभागांमार्फत शुक्र वारी तीन हजार बेल रोपांचे वाटप करण्यात येईल. नागरिकांनी रोपे घेऊन लागवड आणि संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.