नाशिकमध्ये दोन हुक्का पार्लरवर छापा – मद्यसाठा, पॉट जप्त

नाशिक: शहरात गेल्या अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी हुक्का पार्लर सुरु होते. याबाबत चर्चाही सुरु होती. मात्र पोलीस यावर कारवाई का करत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला होता. अखेर काल पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून कारवाई केली.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पथक गठीत करण्यात आले आहे. पथकाने हसरुळ पोलीस ठाणे हद्दीतील मखमलाबाद लिंक रोडवरील हॉटेल बार ओ बार व हुक्का पार्लर आणि साईनगर चौफुलीजवळील वुई सर्व्ह हर्बल दिशा ओन्ली या हुक्का पार्लरवर छापा टाकला. पोलिसांनी एकास अटक केली असून सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. छाप्यात मद्यसाठा व हुक्का पिण्याचे दोन पॉट व सुगंधित तंबाखुजन्य हुक्का फेल्वर्स जप्त केले आहेत.

पहिल्या घटनेत, म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीतील मखमलाबाद लिंक रोडवरील हॉटेल बार ओ बारवर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि.२८) छापा टाकला. बारमध्ये हॉटेलमालक कुणाल पदमाकर विसपुते (रा.सिडको)व व्यवस्थापक मनिष सुनील लोखंडे (२२, राणेनगर) अवैधरित्या विदेशी दारुची विक्री करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. ग्राऊंड फ्लोअरवरील हुक्का बारमध्येही पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात राजा रंजित अरोरा (२७, रा.देवळाली कॅम्प), आकाश दीपक सूर्यवंशी (२६, रा.पंचवटी), विजय भाटीया, अमन जैन यांच्यावर कारवाई केली. या ठिकाणी पोलिसांनी ५२ हजार १४० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेत, साईनगर चौफुलीजवळील वुई सर्व्ह हर्बल दिशा ओन्ली या हुक्का पार्लरवर गुरुवारी (दि.२७) पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी हुक्का पार्लरमालक अफताब इस्माईल सैय्यद (२१, रा.नागजी रोड, नाशिक) यास ताब्यात घेतले असून पार्लरमधून हुक्का पिण्याचे दोन पॉट व सुगंधित तंबाखुजन्य हुक्का फेल्वर्स असा एकूण ११ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र अजूनही ही कारवाई पुरेशी वाटत नाही. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत म्हणजेच गंगापूर गावानजीक असलेल्या अनेक हॉटेल्समध्ये हुक्का सुरु आहे. मात्र हे प्रकार पोलिसांच्या वरदहस्तानेच सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.