बेकायदेशीररित्या दारू विक्री आणि गर्दी करणाऱ्यांवर नाशिक पोलिसांनी केली कारवाई

नाशिक: अवैधरित्या विनापरवाना दारू विकणारे तसेच गर्दीच्या ठिकाणी आस्थापना चालू ठेवणार्यांवर पोलिसांनी केली कारवाई !

नाशिक आयुक्तालय हद्दीत, अवैधरित्या विनापरवाना दारू विक्री करणार्यांवर तसेच त्याचा साठ करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले होते. त्याप्रमाणे पोलिसांनी अशा लोकांचा आणि ठिकाणांचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ २) विजय खरात तसेच सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मजगर तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पेट्रोलिंग सुरु केली. त्यावेळी मिळालेल्या माहितीवरून सातपूर मटन मार्केट येथे सागर आनंद सुर्वे नावाचा व्यक्ती अवैधरित्या देशी दारूची विक्री करताना आढळून आला. त्याच्यावर छापा टाकून १४४ प्रिन्स देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे श्रीराम चौकाजवळ काशिनाथ अमृत जगताप हा व्यक्ती अवैधरित्या देशी दारूची विक्री करत असताना सापडून आला. त्याच्या कडूनही २१ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी शहरातील आस्थापना येथे गर्दी होऊ नये याबाबत सूचना दिलेल्या आहेत. असे असताना त्या आदेशाची अवहेलना करतानाही अनेकजण आढळून आले. जिल्हाधिकार्यांनी काढलेला आदेश न मानल्याने सातपुर कॉलनीतील दौलत पान स्टॊल, दर्शन पान स्टॊल, राजाभाऊ पान स्टॊल, अमृत गार्डन हॉटेल, मनाझ वाईन्स, नाशिक ब्रांडी हाउस, रतन वाईन्स, मुथा हॉस्पिटलजवळील पान स्टॊल यांच्यावर भा.द.वी.१८८ नुसार, एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले.