गर्भवती महिलेस वेळीच मिळाली मदत; पोलिसांच्या रूपात जणू देवच आला धावून !

नाशिक (प्रतिनिधी) : पोलीस यंत्रणेकडून केले जाणारे मदतकार्य जरी कर्तव्याचा भाग असला तरी, वेळीच मदत केल्याने पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन होते. त्याचप्रमाणे पहाटे ३ वाजेच्या सुमारास गंगापूर गावाजवळ रस्त्यावर एक गर्भवती महिला व वृद्ध दांपत्य पायी चालत जात होते. दरम्यान, गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने चौकशी करून वेळीच मदत केल्याने या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शनिवारी (दि.२ जानेवारी) रोजी गंगापूर पोलिसठाण्यातील पथक रात्रगस्त करत होते. दरम्यान, पहाटे ३ च्या सुमारास भारती उत्तम जाधव (वय २३, रा.गंगापूर गाव) व तिचे सासू-सासरे रस्त्यावरून पायी चालत जात होते. पोलिसांनी चौकशी केली असता महिला गर्भवती असून, तिला प्रसूती कळा येत होत्या, तर वाहन नसल्याने ते सर्व पायीच रुग्णालयाच्या दिशेने जात होते. दरम्यान, पथकाने तात्काळ नियंत्रण कक्षास संपर्क साधून त्यांची परवानगी मिळवून, गंगापूर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे वाहन बोलावून घेतले. यानंतर सदर महिलेस गिरणारे ग्रामीण रुग्णालयात तातडीने रवाना केले.

या महिलेला पोलिसांनी वेळीच मदत केल्याने महिलेला साडेतीन वाजेच्या सुमारास कन्यारत्न झाले. सदरची कामगिरी पोलिस आयुक्त दिपक पांडे, उप आयुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त दिपाली खन्ना, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पवार, उगले, गिरीश महाले, सोळसे इत्यादींनी माणुसकी दाखवत वेळीच मदतकार्य केले. याबाबत नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.