पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर आजपासून सुरु ; जाणून घ्या काय आहेत सुविधा!

नाशिक (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात आपली कर्तव्य चोख बजावतांना नाशिक पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. म्हणून नाशिक शहर पोलीस दलातील पोलिस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी कोविड केअर सेंटरचे आज (दि.१८) उद्घाटन करण्यात आले.

पोलीस आयुक्तालयाबरोबर काम करणाऱ्या पोलीस अधीक्षक तसेच नाशिक ग्रामीण बरोबर काम करणाऱ्या होम गार्ड्स, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कारागृह अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हे पोलीस कोविड केअर सेंटर पात्र राहील. सदर पोलीस कोविड केअर सेंटर हे पोलीस मुख्यालय, भीष्मराज हॉल येथे उभारण्यात आले आहे. यामध्ये पुरुष कर्मचाऱ्यांसाठी ६० बेड्स आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी ४० बेड्स ची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी २ अँब्युलन्सची सुविधा सुद्धा करण्यात आली आहे. पोलीस कोविड केअर सेंटर विशेष सेलसाठी ९९२१४३७००० आणि ७३५०१२३४०३ हे मोबाईल क्रमांक सुरु करण्यात आले आहेत.  

कोविड केअर सेंटरकरीता नाशिक महानगरपालिका यांच्याकडुन वैदयकिय पथक व रूग्णांचे उपचार व देखभाल व वैदयकिय सुविधा अडीअडचणी सोडविण्यासाठी नोडल अधिकारी म्हणुन डॉ. प्रशांत देवरे, वैदयकिय अधिकारी, पोलीस रूग्णालय,  नाशिक शहर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पोलीस कोविड केयर सेंटरमध्ये रूग्ण आल्यानंतर वैदयकिय अधिकारी त्याचा फाॅर्म भरून घेवुन आवश्यकतेनुसार स्वॅब संकलन करतील. अथवा प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारासंदर्भात निर्णय घेतील. पोलीस कोविड केअर सेंटरचे संदर्भात महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय व अडीअडचणी सोडविण्याकरीता ‘‘विशेष कार्यकारी समिती गठीत करण्यात आलेली आहे.’’