पे टीएम अपडेट करून देण्याच्या बहाण्याने नाशिकला लाखो रुपयांची फसवणूक

नाशिक: शहरात दिवसेंदिवस ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच क्यू आर कोड स्कॅन करायला लावून पैसे लाटण्याचा प्रकार घडला होता. तोच आता पे टीएम ऍप अपडेट करून देण्याच्या बहाण्याने नाशिकमधील दोन जणांना लुबाडण्यात आले आहे. दोन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी मोडस ऑपरेंडी एकाच आहे. आणि या दोन्ही गुन्ह्यातील संशयीतही सारखेच असण्याची शक्यता आहे.

पहिल्या घटनेत तिडके कॉलनी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीस पे टीएम च्या नावाने फोन आला आणि त्यांनी केवायसी अपडेट करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आपली दोन माणसेही घरी येतील असे सांगितले. त्याप्रमाणे ती दोन माणसे आलीही.. आधी केवायसी आणि नंतर पे टीएम अपडेट करण्याचा बहाणा करून फोन ताब्यात घेतला आणि तब्बल पाच लाखांचे ट्रान्झाक्शन केले.

तर दुसरी घटना गोविंद नगर येथे राहणारे अभिजित शिंदे यांच्यासोबत घडली. यांनाही पे टीएम च्या नावाने फोन आला. आणि तुमचे केवायसी अपडेट करायचे आहे असे सांगितले. त्यासाठी समोरच्या व्यक्तीने शिंदे यांना क्विक सपोर्ट, एनी डेस्क असे सोफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले आणि त्यांच्या अकाउंटचा “रिमोट अक्सेस” घेतला. त्यानंतर त्यांच्या नकळत त्यांच्या लिंक केलेल्या बँक अकाउंटमधून मोठी रक्कम परस्पर आपल्या अकाउंटला वळती केली. हि बाब लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ह्या सर्व प्रकारांमध्ये नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पे टीएम सारख्या कंपन्यांनी आपल्या शहरामध्ये अनेक ठिकाणी केवायसी सेन्टर्स उघडले आहेत आणि त्याची माहिती ऍपवर उपलब्ध आहे. त्या ऑथोराईज सेन्टर्सवर जाऊनच नागरिकांनी आपली केवायसी करायला हवी.