BREAKING NEWS: नाशिकमध्ये कोरोनाचा अजून एक पाॅझिटिव्ह

नाशिकमध्ये अजून एक कोरोनाचा पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता नाशिककरांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आपली ट्रॅव्हल हिस्ट्री किंवा लक्षणं न लपविण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

नाशिक – (प्रतिनिधी): नाशिक शहरात कोविड-१९ चा पॉझिटीव्ह रूग्ण असल्याचे प्रशासनाला प्राप्त झालेल्या घशातील स्वँब तपासणी अहवालातून निष्पन्न झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील कोविड-१९ पॉझिटीव्ह रूग्ण संख्या दोनवर पोहचली आहे. या वृत्तामुळे शहरातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. ही माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. संशयित रूग्णांचे जे नमुने तपासणीसाठी पाठवले होते, त्यांचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यामध्ये नाशिक शहरातील असलेली एक व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आली असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले. या व्यक्तीवर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात कोण-कोण आले आहे याबाबची माहिती मिळविणे सुरू झाले आहे. ज्या नागरिकांनी दिल्ली परिसरातून अथवा पर जिल्ह्यातून प्रवास केला असेल अशा व्यक्तींनी स्वत:हून पुढे येऊन तपासणी करून घ्यावी तसेच नागारिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे. दरम्यान यापूर्वी लासलगाव परिसरात आढळलेल्या पॉझिटीव्ह रूग्णावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिऱ्यांनी दिली आहे.