हातावर पोट असणाऱ्यांसाठी नाशिक महापालिकेनी दिला मदतीचा हात !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन केल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले. नाशिकमध्येही असे अनेक मोलमजुरी करून पोट भरणारे कामगार आहेत, ज्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था नव्हती. पण आता अशांसाठी नाशिक महानगरपालिकेनी मदतीचा हात दिला आहे.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. व्यवसाय बंद झाल्यामुळे हजारो मोल मजुरी करणारे कामगार काम विना राहिले असून ते त्यांच्या मूळ गावी परत जाण्याचा मार्ग शोधत आहे.

अशा परिस्थितीत त्यांना तात्पुरता आधार /आसरा देण्यासाठी सध्या नाशिक महानगरपालिकेनी पाउल उचलले आहे. शहरातील सर्व शाळा बंद असल्यामुळे नाशिक महानगरपालिका नाशिक पूर्व, पश्चिम,पंचवटी,सातपूर, नवीन नाशिक व नाशिक रोड या ६ विभागात प्रत्येकी तीन अश्या एकूण १८ शाळेमध्ये लॉक डाउन संपेपर्यंत व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी मोलमजुरी करणारे कामगार, बेघर यांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी ही ठिकाणे घोषित करण्यात आली आहेत. याठिकाणी शौचालय आंघोळीसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक शाळेसाठी नोडल ऑफिसर व सहाय्यक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या ठिकाणी गर्दी होणार नाही व सामासिक अंतर हे एक मीटर राहील याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शाळेतील लाभार्थ्यांना अशासकीय संघटनांमार्फत अन्नपाण्याची व्यवस्था करणे बाबत सूचना करण्यात आली आहे.तसेच याठिकाणी सकाळी ८ते रात्री ८ व रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत सुरक्षारक्षकांची व्यवस्था करणे बाबत सूचना करण्यात आल्या असून प्रत्येक शाळेत कामाठी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.