नाशिक महानगरपालिकेचे ३२५ कोटी रुपये येस बँकेत अडकले !

नाशिक: रिझर्व बँकेने येस बँकेवर नुकतेच निर्बंध आणले आहेत. याबाबत येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्यावरही इडीने प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. या प्रकारचा फटका जसा सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे तसाच नाशिक महानगरपालिकेलाही बसला आहे. नाशिक महानगरपालिकेचे तब्बल ३२५ कोटी रुपये येस बँकेत अडकल्याची धक्का दायक बाब समोर आली आहे.

नाशिक महानगरपालिका प्रशासनाला कररूपाने जमा होणारे ३२५ कोटी रुपये तर स्मार्ट सिटी कंपनीचे सुमारे १५ कोटी रुपये अडकल्यामुळे त्याचा परिणाम विकासकामांवर तर होणारच आहे शिवाय स्मार्ट सिटीची कामेही रखडण्याची शक्यता आहे. नाशिक महानगरपालिकेची इ-सुविधा येस बँकेशी निगडीत आहे. त्यामुळे सर्व भरणा तातडीने “ब्लॉक” करण्याची नामुष्की नाशिक महानगरपालिकेवर आली आहे. नागरी सेवा केंद्रांमधील सर्व प्रकारचा करभरणा स्टेट बँकेमध्ये रोख स्वरुपात कर्मचाऱ्यांना स्वीकारण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. ऐन मार्च महिन्यामध्ये हा प्रकार घडल्यामुळे ही स्वायत्त संस्था अडचणीत आली आहे. त्यामुळे ठेकेदारांची देयके देण्यातही अडचणी येणार आहेत.

पाच वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेने आपले बहुतांश व्यवहार येस बँकेकडे वर्ग केले होते. त्यांच्या माध्यमातून सहा ठिकाणी कॉमन फॅसिलिटी सेंटर चालवले जाते. त्यात जन्ममृत्यू दाखल्याच्या शुल्कापासून तर घरपट्टी, पाणीपट्टी सर्व रक्कम जमा केली जाते. वेबसाईटवरून ओनलाइन भरणा येस बँकेत होऊ नये म्हणून ती डिसेबल करण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अडचणीत ?

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कोर्पोरेशन लिमिटेड कंपनीने येस बँकेतल्या त्यांच्या खात्यातून दोन महिन्यापूर्वीच ४५० कोटी रुपये स्टेट बँकेत वर्ग केले होते. त्यामुळे आता एकूण रकमेपैकी १४ कोटी ७१ लाख रुपयेच येस बँकेत अडकले आहेत.