आता नाशिकचे महापौरच म्हणतात कडक लॉकडाऊन करा !

आता नाशिकचे महापौरच म्हणतात कडक लॉकडाऊन करा !

नाशिक (प्रतिनिधी): लॉकडाऊन नको अशी आतापर्यंत भूमिका मांडणारे महापौर सतीश कुलकर्णी हेच आता लॉकडाऊन झाला पाहिजे अशी मागणी करत आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे महापौरांनी ही मागणी केली आहे.

महापौरांनी म्हटले की, शहरातील कोरोना संसर्गाची स्थिती जवळपास हाताबाहेर जात आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या मर्यादित असल्याने उपचार करण्यास प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशाही परिस्थितीत प्रशासन व पदाधिकारी सातत्याने योग्यप्रकारे कामकाज करीत आहे. सद्यस्थितीत रॅपिड अँटिजेन टेस्ट, आरटीपीसीआर, एचआरसीटीसी तपासणीकरिता नागरिकांच्या रांगा कमी होताना दिसून येत नाही.

हे ही वाचा:  निर्दयी आई.. त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या आईनेच केल्याचे निष्पन्न..

त्यामुळे टेक्निशियन स्टाफवर दबाव निर्माण होउन हॉस्पिटल प्रशासन यंत्रणेवर प्रचंड प्रमाणात ताण निर्माण झालेला आहे. शहरातील सर्वच स्मशानभूमी अहोरात्र धगधगत असूनही मृतांच्या अंत्यविधीकरिता नातेवाइकांना वाट पहावी लागत आहे. याचबरोबर रेमडेसिविर व इतर तत्सम औषधे मिळविण्याकरिता नातेवाइकांची होणारी धावपळ सामाजिक संसर्गास कारणीभूत ठरत आहे. या लाटेत आता वृद्धांबरोबर तरुण व लहान मुलेही बाधित होऊन ते आपला जीव गमावत आहे.

हे ही वाचा:  नाशिक हादरलं! तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या

त्यामुळे शहरातील व्यापार काही दिवस थांबल्यास निश्चितच कोरोनाची साखळी तोडण्याच्या प्रयत्नास यश मिळणार आहे. काही दिवसांकरिता आर्थिक व्यवहार जरी थांबणार असला तरी त्यात नाशिककर मात्र जगेल अशी आशा आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून व्यवसाय थांबवणे हे गरजेचे व अत्यावश्यक असून जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने आपल्या स्तरावरुन तातडीने निर्णय घेण्यात यावा.