गारपीट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आमदारालाच ठेवले कोंडून !

गारपीट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आमदारालाच ठेवले कोंडून

नाशिक (प्रतिनिधी): सध्या महावितरण कडून शेतकऱ्यांच्या थकीत विजबिलामुळे वीज कनेक्शन काढून टाकले जात आहे, ज्यामुळे शेतकरी आणि महावितरण असा वाद पुढे आला आहे. ह्याच वादातून शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आलेले आमदार दिलीप बोरसे यांना ग्रामपंचायत कार्यलयात कोंडल्याचा प्रकार समोर आला आहे.

एकीकडे अवकाळी पाऊस व गारपीटीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे शेतीसाठी जोडलेले वीज कनेक्शन दोन दिवसांपासून खंडित केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आलेले आमदार दिलीप मंगळू बोरसे यांना सटाणा तालुक्यातील केरसाणे ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. जोपर्यंत शेतीसाठी लागणारे वीज कनेक्शन जोडले जात नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर पडू देणार नाही असा पवित्रा देखील ह्या शेतकऱ्यांनी घेतला,त्याच बरोबर ग्रामस्थांनी कार्यालयाबाहेरच ठिय्या देखील मांडला होता.

दरम्यान, बंद असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयातूनच तातडीने तात्काळ विजजोडणी करा असे आदेश दिल्यानंतर महावितरणने विजजोडणी सुरू केल्यानंतर  ग्रामस्थांनी आमदार दिलीप बोरसे यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर सोडले.

त्यामुळे आता शेतकरी आणि महावितरण वाद चांगलाच चिघळण्याची चिन्ह आहे शासनाने वेळीच यातून मार्ग न काढल्यास हा वाद विकोपाला जाऊ शकतोय…