नाशिक: पॅराशूट भरकटल्यानं तीन जवानांपैकी एक जवान झाडावर अडकला आणि…

गांधी नगर येथे विमानातून पॅराशूटद्वारे जमिनीवर उडी मारण्याचे प्रात्यक्षिक करणाऱ्या एक भारतीय जवान अडचणीत आला.. त्याचे पॅराशूट उपनगर येथील एका बाभळीच्या झाडावर अडकले. काट्याकुट्यात अडकलेल्या जवानाची नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड तोडून सुटका केली. आज सकाळी साडेनऊ वाजता हा प्रकार घडला.

नाशिकच्या गांधी नगर येथील आर्टिलरी सेंटरच्या केंद्रात वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. त्याअंतर्गत विमानातून पॅराशूटद्वारे उतरण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. असे प्रशिक्षण घेत असलेल्या काही जणांनी आज सकाळी एका विमानातून 13 हजार फुटांवरून उडी मारली. त्यापैकी हनिफ नापा या लष्करी जवानाचे पॅराशूट वारा सुटल्याने भरकटले. यानंतर हनिफ नापा उपनगरातील अमित काठे यांच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडावर अडकले. अमित कोठे यांनी झाडाची फांदी तोडून नापा यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अपयश आलं. यानंतर त्यांनी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार नाशिक शहरातील शिंगाडा तलाव आणि पंचवटी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन झाड तोडले आणि त्या जवानाची सुखरुप सुटका केली. नापा यांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. मात्र बाभळीचे काटे अंगाला टोचल्याने जवानाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. पॅराशूट फेल झाल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.