हॉटेल आणि कार्यालयांना पुन्हा ५० टक्के क्षमतेची मर्यादा

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने सोमवारी नवे निर्बंध लागू केले. यानुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट, कार्यालये, चित्रपटगृहांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली असून कार्यालयांनी ‘वर्क फ्रॉम होम’ ला प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हे नवे निर्बंध ३१ मार्च पर्यंत राहतील. लग्न सोहळ्याला ५० जणांनाच परवानगी असेल.

मर्यादेचे उल्लंघन केल्यास कार्यालयांच्या मालकांवर कारवाई होईल. तसेच अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी असेल. दरम्यान, आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर शासकीय, निमसरकारी, खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारीच उपस्थित असावेत, असे निर्देश आहेत. कार्यालये, आस्थापनांमध्ये मास्क व तापमान तपासूनच प्रवेश मिळेल. शॉपिंग मॉल्समध्येही हे नियम लागू राहतील.

लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध : आरोग्यमंत्री टोपे
वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. रुग्णालयात खाटांची कमतरता नाही. संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ‘ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट’ या त्रिसूत्रीनुसार काम केले जात आहे.