नाशिक: सोने झाले इतक्या रुपयांनी स्वस्त

नाशिक (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय बाजारातील विक्रीच्या माऱ्यामुळे चोख सोन्याचे दर स्थानिक बाजारात एकाच दिवसात १२०० रुपयांनी घसरले. बुधवारी (दि. १७) नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रॅमचे दर ४८,९०० रुपये होते. ते गुरुवारी १२०० रुपयांनी स्वस्त होऊन ४७,७००  रुपयांवर आले तर २२ कॅरेटकरिता हेच दर अनुक्रमे ४५,२३० आणि ४४,१९० रुपये होते.

विशेष म्हणजे, ऐन लग्नसराईत हा दर थोडा कमी झाल्याने खरेदीदारांना थोडा दिलासा मिळणार आहे. तर चोख सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांकडून मागणीत वाढ होत आहे. अमेरिकेत बँकेच्या ठेवींवरील व्याजदरांत वाढ होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर तेथील गुंतवणूकदारांनी सोने विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू करून बँकेत ठेवी ठेवण्यास व बाँड खरेदीला सुरुवात केली आहे. याचमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर दर घसरण सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी या घसरणीच्या परिणामस्वरूप स्थानिक बाजारात चोख सोने १२०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.