बर्ड फ्ल्यू प्रभावित जिल्ह्यातून कुक्कुट क्षेत्राशी संबंधित आवक नाशिकमध्ये करण्यास बंदी !

नाशिक (प्रतिनिधी): बर्ड फ्ल्यू प्रभावित संलग्न जिल्ह्यातून कुक्कुट क्षेत्राशी संबंधित आवक नाशिक जिल्ह्यात करण्यास बंदी बाबतचे आदेश नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सोमवारी (दि. १८ जानेवारी २०२१) सायंकाळी काढले आहेत. तसेच याबाबतची कारवाई ताबडतोब करण्याबाबतही म्हंटले आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आधीच झालेला आहे तेथून नाशिक जिल्ह्यामध्ये कोणतेही कोंबडी अथवा कोंबडी जन्य पदार्थ आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

प्रभावित संलग्न जिल्ह्यातून कुक्कुट पालन क्षेत्राशी संबंधित बाबी उदा. कुक्कुट पक्षी, कुक्कुट पक्षांचे मांस, अंडी, कोंबडी खत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणे यांचा या बंदीमध्ये समावेश आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात अद्याप कोणताही संसर्ग झालेला नसल्याने आपल्या जिल्ह्यातून कोंबडी व कोंबडी जञ पदार्थ बाहेर पाठवण्यावर कोणतीही बंदी नाही. तसेच आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कोंबडी चिकन यांचे खाद्यपदार्थ म्हणून वापर करण्यावर सुद्धा कोणतेही निर्बंध नाहीत याची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.