जिल्ह्यातील ६३ रुग्णांनी केली कोरोनावर मात; मालेगांवातून ५१ रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक(प्रतिनिधी): कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा साडे सहाशेच्या पुढे गेला असला, तरी या संसर्गातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही दिलासा देणारे आहे. कोरोनाचा वेग कमी कसा करता येईल यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. त्यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यातील ६३ कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून ६३  पैकी रेड झोन असलेल्या मालेगांव शहरातील सर्वाधिक म्हणजे ५१ रुग्णांना पूर्णणपणे बरे करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आल्याची माहिती, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

रविवारी, १० मे २०२० रोजी प्राप्त अहवालानुसार नाशिक ग्रामीणमधून २, नाशिक मनपा १०, मालेगाव मनपा ५१ असे एकूण ६३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, तब्बल ४ हजार ६०७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या ५७४ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत. त्यात २ जणांचे गृह विलगीकरण करण्यात आले आहे. तसेच ५३३ अहवाल प्रलंबित असल्याचेही मांढरे म्हणाले.

मालेगावातूनही मिळतोय दिलासा

मालेगाव येथील ५३४ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र असे असले तरी याच मालेगावातील ५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.  महसूल, आरोग्य , पोलिस मनपा, जि प. सर्वच विभाग उपलब्ध सामग्री आणि मनुष्यबळ पणाला लाऊन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. संकटाची व्याप्ती मोठी असल्याने केवळ निरंतर प्रयत्न आणि संयम यावरच ही लढाई जिंकता येईल , असेही मांढरे यांनी सांगितले.

रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न

कोरोनाबाधितांना लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता या रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्नांची बाजी लावत असून, लवकरच जिल्ह्यातील कोरोना मुक्त रुग्णांचा आकडा वाढलेला दिसेल, असेही मांढरे यांनी सांगितले.