या योजनेतून प्रत्येक पथविक्रेत्याला ‘इतके’ कर्ज बँकेमार्फत विनातारण मिळणार..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेमध्ये मा.केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना (PM SVANidhi) शासन निर्णय दिनांक १७ जून,२०२० अन्वये योजनेची अंमलबजावणी  सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून असणारा प्रमुख उद्देश असा आहे की प्रत्येक पथविक्रेत्याला १० हजार रुपयेचे एका वर्षासाठी बँकेमार्फत विनातारण कर्ज उपलब्ध होणार आहे, नियमित कर्ज परतफेड केल्यास ७% व्याज अनुदान व डिजिटल व्यवहार केल्यास कॅश बॅक मिळेल. मुदतील कर्ज फेड केल्यास बँकेकडून दुस-यांदा २० हजारचे कर्ज उपलब्ध होईल.

केंद्र शासनाने मनपाला १७,८४० पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. नाशिक मनपाने एकूण ९६२० पथविक्रेत्यांचे सर्व्हेक्षण केलेले असून त्यांची यादी मा.केंद्र शासनाच्या www.pmsvanidhi.mouha.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. या पथविक्रेत्यांचे मनपाचे २१ सुविधा केंद्र व इतर खाजगी ग्राहक सेवा केंद्र (CSC)/ आपले सरकार केंद्राद्वारे कर्जाचे ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहे व ज्या पथविक्रेत्यांचे सर्व्हेक्षण यादीमध्ये नाव नाही त्यांच्यासाठी मनपाचे ऑनलाईन शिफारस पत्र (LoR – Letter of Recommendation) घेण्यासाठी ऑनलाईन LoR नोंदणी करून शिफारस पत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आज पर्यंत एकूण १२०५ पथविक्रेत्यांनी कर्जाचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आले आहे त्यापैकी १९५ पथविक्रेत्यांना बँकांनी कर्ज मंजूर केले आहे. मनपाच्या शिफारस पत्रासाठी ७१८ पथविक्रेत्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली असून ५१३ पथविक्रेत्यांना मनपाने शिफारस पत्र देण्यात आले आहे. शिफारस पत्र प्राप्त पथविक्रेत्यांना कर्जाचे ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व पथविक्रेत्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मा.महापौर सतीश कुलकर्णी आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. PM SVANidhi योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेसाठी विविध उपाययोजना करणेत येत आहे. पथविक्रेत्यांनी ऑनलाईन अर्ज भरणेसाठी किंवा अधिक माहितीसाठी विभागीय अधिकारी यांचेकडे संपर्क करावा असे आवाहन सर्व पथविक्रेत्यांना मनपाच्या वतीने  करणेत येत आहे