नाशिक शहरात या आठवड्यात गुरुवारी तर पुढील आठवड्यापासून या दिवशी पाणी पुरवठा बंद..

नाशिक शहरात या गुरुवारी पाणीपुरवठा नाही; मात्र पुढच्या आठवड्यापासून या दिवशी पाणीपुरवठा बंद..

नाशिक (प्रतिनिधी): तुरळक पाऊस सुरू असला तरी गंगापूर धरण समुहाचा पाणी साठा २५ टक्क्याच्या खाली गेल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशान्वये दोन दिवसांनी अर्थातच गुरूवारी आठवड्यातील एक दिवस संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी ईद असल्यामुळे गुरुवारी पाणीकपात होणार असली तरी पुढील आठवड्यापासून मात्र बुधवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गंगापूर धरणाचा साठा ५० टक्के होईपर्यंत ही कपात सुर राहील असे पालिकेने स्पष्ट केले आहे. ऐन पावसाळ्यात नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे.

जूनपाठोपाठ जुलै महिन्यातील तिसरा आठवडा उलटल्यानंतरही नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे तसेच दारणा धरण समूहामध्ये समाधानकारक पाऊस नाही. सध्यस्थितीत, गंगापूर धरणसमुहात २५ टक्के, मुकणे धरणात २४ टक्के तर दारणा धरणात ४९ टक्के पाणीसाठा आहे. मात्र दारणा धरणातून चेहडी बंधाऱ्यात येणारे पाणी उचलणे शक्य होत नाही.

धरणातील पाणी स्थिती गंभीर होत असल्यामुळे पाणी कपात करावी असा प्रस्ताव प्रशासनाने मांडल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी पहिल्यांदा फेटाळला तर दुसऱ्यांना ठोस निर्णय घेण्यास विलंब लावला. हे बघून पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर गुरुवारपासून शहरात एक दिवस पाणीकपात करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी पालिकेने सुरू केली आहे.

गुरूवारी एक दिवस कपात केली जाणार असून पुढील आठवड्यापासून दर बुधवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.त्यामुळे नागरिकांना महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.