नाशिकच्या ५ केंद्रांचा अपवाद वगळता आज लसीकरण बंद !

नाशिक (प्रतिनिधी): पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय तसेच नाशिकरोड येथील खोले मळा शहरी आरोग्य केंद्र येथे कोविशिल्डची लस १८ ते ४४ या वयोगटातील नोंदणी केलेल्या व्यक्तींना लस मिळेल. तर सिडको, सातपूर, पंचवटी मायको दवाखाना येथे १८ ते ४४ या वयोगटातील नोंदणी केलेल्या व्यक्तींना कोव्हॅक्सीन ही लस मिळेल, असे सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी प्राप्त झालेले कोविशिल्डचे साडेचार हजार डोस संपुष्टात आल्यामुळे महापालिकेने शनिवारी शहरातील ५५ केंद्रांवरील लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी लस आल्यास रविवारी लसीकरण करायचे की नाही याबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान, राज्य शासनाकडून १८ ते ४४ वयोगटासाठी प्राप्त झालेल्या लसींच्या साठ्यातून शहरातील पाच लसीकरण केंद्रांवर मात्र लसीकरण होणार आहे.
१ मे पासून महापालिका क्षेत्रात लसीकरणाचा खेळ सुरू झाला आहे. लस कधी येईल व कधी येणार नाही, याबाबत पालिकेकडून पुरेशी जनजागृती केली जात नसल्याने लसीकरण केंद्रांवर कडक उन्हात नागरिकांना रांगा लावण्याची वेळ आली आहे. त्यात अचानक लस संपत असल्यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी लसीकरणाचे वेळापत्रक नागरिकांना मिळाले पाहिजे, अशी कानउघाडणी केली होती.

मात्र महापालिकेला जिल्हा रुग्णालयामार्फत लस कधी मिळेल याबाबत अखेरच्या क्षणी माहिती मिळत असल्यामुळे याबाबत नागरिकांना जागरूक करणे अवघड जात आहे. बुधवारी महापालिकेला कोविशिल्डचे साडेआठ हजार डोस प्राप्त झाले होते. हे डोस बुधवारी व गुरुवारी वापरण्यात आले. शुक्रवारी सकाळी साडेचार हजार कोविशिल्डचे डोस आल्यानंतर २९ केंद्रामार्फत लसीकरण करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी आढावा घेतल्यानंतर काही लसीकरण केंद्रावर तुरळक साठा असल्यामुळे उगाच गर्दी जमवण्यापेक्षा पुरेसा साठा आल्यानंतर लसीकरण करण्याची भूमिका महापालिकेने घेतल्याची माहिती या मोहिमेच्या समन्वयक डॉ. अजिता साळुंखे यांनी दिली.