नाशिकच्या रस्त्यांवर वाहतूक सुरु आणि सिग्नल बंद ?

नाशिक(प्रतिनिधी): लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट मिळाल्यानंतर लोकांनी आपली दुकानं उघडायला सुरुवात केली. त्यामुळे खरेदी करण्यासाठी लोकं रस्त्यावर येऊ लागले. आणि त्यामुळे वाहतुकीतही वाढ झाली, मात्र सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहने सैरभैर धावत आहेत. अशा परिस्थितीत अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे जर वाहनांना रस्त्यांवर यायला परवानगी असेल तर ताबडतोब सिग्नल सुरु करावेत अशी मागणी होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. सुरवातीला लॉकडाऊन मध्ये कोणतीही विशेष मुभा देण्यात आली नव्हती. परंतु आता लॉकडाऊन ४.० मध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अत्यावश्यक सेवा वगळता एकल दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. दैनंदिन वापरासाठी आवश्यक त्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. पादचाऱ्यांसोबतच वाहनांचीसुद्धा गर्दी वाढत चालली आहे. म्हणून काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर तसेच अनेक भागांमध्ये वाहनचालकांची गर्दी होतांना दिसून येत आहे.

अशातच शहरातील सिग्नल यंत्रणा बंद असल्याने गर्दी आणि गोंधळाचे वातावरण तयार झाले असून वाहन अपघातांची शक्यता वाढली आहे.. सिग्नल यंत्रणा बंद असल्याने  वाहनचालक सिग्नलचे कोणतेही नियम स्वशिस्तीने पाळताना दिसत नाहीत. लॉकडाऊन ४.० मध्ये जवळजवळ सर्वच व्यवहारांना सूट देण्यात आली, अर्थचक्राचा विचार करून शिथिलतेचे निर्णय घेण्यात आले असले तरीही, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहनचालकासोबतच पायी  चालणाऱ्या नागरिकांच्या जीवाला देखील धोका आहे. अशा वेळेस कोणत्याही प्रकारची हानी अथवा जीवितहानी होऊ नये म्हणून लवकरात लवकर शहरातील सिग्नल यंत्रणा सुरु करणे गरजेचे आहे.