४० हजारांच्या टोसिलीझुमॅब इंजेक्शनची २ लाख ६० हजारांना विक्री; चौघांना अटक

नाशिक (प्रतिनिधी): रेमडेसिविरचा काळाबाजार होत असतानाच आता टोसिलीझुमॅब इंजेक्शनचाही काळा बाजार सुरू झाला आहे. ४० हजार रुपयांचे हे इंजेक्शन तब्बल २ लाख ६० हजार रुपयांना विक्री करणाऱ्या दोघाना तर इंजेक्शन आणून देणाऱ्या दोघांना अशा चौघांना बुधवारी (दि. ५) गंगापूर रोडवर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सापळा रचून अटक केली.

संकेत अशोक सावंत रा. राजपाल कॉलनी, मखमलाबाद नाका, प्रणव केशव शिंदे, रा. पिंपळगाव बसवंत अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात औषध नियंत्रण किंमत कायदा, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि औषध निरीक्षक सुरेश देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुपारी कार्यालयात असताना फोन आला. एकजण इंजेक्शन अधिक भावाने विक्री करत असल्याची माहिती मिळाली. याआधारे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना कळवले. बनावट ग्राहक पाठवत संशयितांना फोन केला.

एका इंजेक्शनसाठी २ लाख ६० हजार रुपये किंमत सांगितली. पथकाने सापळा रचला. गंगापूररोडवर एका हॉस्पिटलखाली ग्राहक उभा असताना चारचाकी क्रमांक एमएच १५ एफएन ५०५५ त्या ठिकाणी आली. ग्राहकाने इंजेक्शन घेताना हात वर केला असता दबा धरून बसलेल्या पथकाने कारमधील दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत संकेत सावंत, प्रणव शिंदे अशी नावे सांगितली. दोघांकडून इंजेक्शन आणि बनावट ग्राहकाकडून घेतलेले पैसे जप्त करण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे, श्रीराम पवार, विजय लोंढे,, नंदकुमार नांदुर्डीकर, मोतीलाल महाजन, बाळा नांद्रे, संतोष माळोदे, यशवंत बेंडकुळे यांच्या पथकाने उपआयुक्त संजय बारकुंड, सहायक आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. गंगापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित सावंत व शिंदे या दोघांच्या चौकशीत शुभम रौंदळ आणि अक्षय रौंदळ या दोघा भावांनी इंजेक्शन महामार्गावरील हॉटेल जत्रा परिसरात आणून दिल्याची कबुली दिली. पथकाने दोघांना रात्री उशिरा ताब्यात घेतले.