स्कॉलरशिपचे आमिष दाखवून पालकाला पावणेतीन लाखांचा गंडा

नाशिक (प्रतिनिधी): ऑनलाइन शिक्षण आणि मुलांना स्कॉलरशिप देण्याचे आमिष देत पालकाला ऑनलाइन दोन लाख ७५ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सर्व शिक्षण सोल्युशन एलएलपी या कंपनीच्या प्रतिनिधीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि रवींद्र पांडे (रा. उत्तमनगर) यांच्या तक्रारीनुसार संशयित शिक्षण सोल्युशन एलएलपी या कंपनीच्या माध्यमातून स्कॉलरशिप मंजूर झाल्याचे सांगत ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ऑनलाइन माध्यमातून दोन लाख ७५ हजार वेळोवेळी लिंकद्वारे भरण्यास भाग पाडून चार ते पाच मोबाइलधारकांची फसवणूक केल्याची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दिली.