नाशिक शहरात कोरोनामुळे अजून एका रुग्णाचा बळी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. २ जून २०२०) एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बिडीकामगार नगर, अमृतधाम येथील 56 वर्षीय पुरुष दिनांक 31 मे 2020 रोजी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयातील कोविंड अतिदक्षता विभागामध्ये दाखल झाले. त्यापूर्वी दिनांक 30 मे 2020 रोजी सदर रुग्णाला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

 तिथे त्यांना छातीत दुखणे, खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांचा तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. दिनांक 31 मे रोजी तपासणी अहवाल कोरोना बाधित आल्याने संबंधित रुग्णाला पुढील उपचारासाठी दिनांक 31 मे रोजी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालय नाशिक येथे संदर्भित करण्यात आले. जिल्हा रुग्णालय नाशिक येथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकामार्फत त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले. रुग्णाला पूर्वीपासून मधुमेह व रक्तदाबाचा विकार होता. रुग्णाची प्रकृती अत्यंत अस्वस्थ असल्याने त्यांना पूर्णवेळ O2 पुरवठा सुरू होता. 2 जून रोजी पहाटे रुग्णाची प्रकृती अधिकच खालावली व पहाटे 5 वाजून 30 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. संबंधित रुग्णाची माहिती ही महापालिका आरोग्य विभागास पुढील कार्यवाहीसाठी कळविण्यात आली.