नाशिक शहरात खासगी रुग्णालयातील डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह; अजून एक कन्टेनमेंट झोन

नाशिक (प्रतिनिधी): आज (दि. 4 मे 2020) रोजी नाशिक शहरांमधील एक रुग्ण कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका नाशिक तर्फे विविध पथके तयार करून तातडीने त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले. नव्याने प्रतिबंधित क्षेत्र जनरल वैद्यनगर (नाशिक पुणे रोड) येथे तयार करण्यात आलेला आहे. याबाबत प्रतिबंधक क्षेत्राचा आदेश आयुक्त नाशिक महानगरपालिका यांनी निर्गमित केलेला आहे.

कन्टेनमेंट झोनचा नकाशा:

याबाबत पोलिसांना अवगत करून योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध पथका मार्फत दैनंदिन सर्वेक्षण करून संशयित रुग्ण शोधण्यात येतील. आज कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झालेला रुग्ण हे डॉक्टर आहेत व ते खाजगी हॉस्पिटल मध्ये सेवा देत आहेत. त्या डॉक्टर एका बाधित रुग्णाला सेवा देतांना संपर्कात आल्या होत्या व त्याअनुशंगाने त्यांना त्या दिवसापासुनच कोरंटाईन केलेले होते व त्यांचे सहकारी डॉक्टर व इतर संपर्कात आलेला स्टाफ कोरंटाईन केलेला आहे व त्यांचे अहवाल तपासणी करीता पाठविलेले आहेत. कोराना बाधित भागातून नाशिक शहरांमध्ये येणाऱ्या नागरिकांना किंवा त्यांच्यामुळे इतरांना कोरोना विषाणूचा संसर्ग होतो, या गोष्टीची दखल घेऊन नाशिक महानगरपालिका पालिकेतर्फे पोलीस यंत्रणेला कळविण्यात आलेले आहे.