नाशिकमध्ये पहिले आयुर्वेदिक इम्युनिटी क्लिनिक सुरु

नाशिक (प्रतिनिधी): कोवीड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामान्य नागरिक तसेच कोरोना रुग्ण यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हाच सध्या एकमेव उपाय दिसत आहे. यामुळे विविध माध्यमातून लोकांनी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी कुठले उपाय केले पाहिजे याबाबत आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये आयुर्वेद शास्त्रावर अधिक भर देण्यात आला आहे. हिच गोष्ट लक्षात घेऊन आयुर्वेद शास्त्रामध्ये अधोरेखित केलेल्या आहार, व्यायाम, योग, प्राणायाम, मर्म चिकित्सा, नैसर्गिक जीवनशैली,  पंचकर्म तसेच औषधी वनस्पती यांच्या आधारे व्याधीप्रतिकार वर्धक उपायांबाबत विशेष मार्गदर्शन करणारे नाशिकमधील पहिले ‘आयुर्वेदिक इम्युनिटी क्लिनिक’ सुरु करण्यात आले आहे. या क्लिनिकचे डिजीटल पद्धतीने उद्घाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

संपूर्ण भारतात आयुर्वेदिक इम्युनिटी क्लिनिक संकल्पना द आर्य वैद्य फॉर्मसी कोईंबतुर लि. याच्या सहाय्याने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नाशिकमध्ये पहिलेच आयुर्वेदिक इम्युनिटी क्लिनिक विश्वगंध आयुर्वेद हॉस्पीटल व रिसर्च सेंटर, माणिक नगर, गंगापुर रोड येथील येथे सुरु करण्यात आले आहे. यावेळी सिव्हील सर्जन डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. तुषार सुर्यवंशी, डॉ. जयश्री सुर्यवंशी, डॉ. शैलेश निकम, डॉ. रविभुषण सोनवणे व आर्य वैद्य फार्मसीचे राकेश शेंडे उपस्थित होते.

यावेळी भुजबळ म्हणाले की, लहानपणापासून आजीच्या बटव्याच्या रूपाने सगळ्यानाच आयुर्वेद परिचित आहे. मात्र आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिकच्या माध्यमातून हेच ज्ञान शास्त्रोक्त आणि योग्य पद्धतीने पोहोचणार आहे. कोरोनाशी लढतांना अशा आयुर्वेदिक इम्युनिटी क्लिनिकची मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु असतांना लोकांची प्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर रुग्ण कमी वेळेत बरा होईल. याशिवाय मृत्युचे प्रमाण कमी होण्यास याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नँशनल इंटिग्रेटेट मेडिकल असोशिअशनच्या माध्यामातून शहरातील विविध भागात लवकरच आयुर्वेदिक इम्युनिटी क्लिनिक सुरु केले जाणार असून गरजू लोकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थितांना आयुर्वेदिक इम्युनिटीचे वाटप करण्यात आले.