नाशिकमध्ये यंदाचा गणेशोत्सव असा होणार साजरा!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात गणेशोत्सव यंदा साधेपणाने साजरा केला जाणार आहे. शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गणेशमंडळांनी चांगला कृती आराखडा तयार करण्याचे आवाहन नाशिक शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

नाशिक महानगरपालिका गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे मांडला होता. या विषयावर सोमवारी (दि.०६) बैठक घेण्यात आली. त्यामध्ये कोरोनाविषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता शासन ठरवेल त्या नियमाप्रमाणेच गणेशोत्सव साजरा करणार असा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातील गणेश मंडळांनी जास्तीत जास्त तीन फुटांच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे यावर्षी गणेशोत्सवादरम्यान गणेश मूर्ती प्रतिष्ठापना मिरवणूक, विसर्जन मिरवणूक निघणार नाही, गणेशोत्सावादरम्यान कुठल्याही प्रकारचे डीजे, लाउडस्पिकर यांचा वापर केला जाणार नाही. शहरातील गणेशोत्सव मंडळ लॉकडाऊनच्या कालवाधीत गोरगरिबांना अन्नधान्य, मास्क, औषधांचे वाटप करणार आहेत तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणार असल्याचे गणेशोत्सव मंडळाच्या सभासदांनी सांगितले आहे. याव्यतिरिक्त शासनाने ठरवून दिलेले नियम करूनच यंदाचा गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी सांगितले.