नाशिक शहरात ऑनलाईन गंडा; साडे आठ लाखाची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी): सर्वत्र लॉकडाऊनचे वातावरण असताना भामट्यांनी शहरातील एकास ऑनलाईन गंडा घातला आहे. फोर जी सीमकार्ड ॲक्टीव्हेट करुन देण्याचे आमीष दाखवून फिर्यादीचा पगार तसेच ऑनलाईन पर्सनल लोन मंजूर करुन घेत तब्बल साडे आठ लाख रुपयांना हातोहात गंडवण्यात आले आहे. रोजच्या रोज असे गुन्हे घडत असूनही काही लोकं या फसवणुकीला बळी पडत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश सुकदेव आहेर (वय ४२, रा. बी/२, गुरुदर्शन रो हाऊस, आनंदघन कॉलनी, मुरकुटे हॉलमागे, अंबड लिंक रोड) यांना गंडवण्यात आले आहे.

संशयितांनी आहेर यांना संपर्क साधत फोर जी सीमकार्ड ॲक्टीव्हेट करण्याचे आमीष दाखवले. त्यासाठी आहेर यांच्याकडून  बोलण्याच्या नादात त्यांच्या आयसीआयसीआय बँक खात्याचा ऑनलाईन ॲक्सेस घेतला. त्याद्वारे खात्यातील शिल्लक रक्कम, मे महिन्याचा पगार तसेच आहेर यांच्या नावावर ऑनलाईन पर्सनल लोन मंजूर घेत असे एकूण आठ लाख ४९ हजार ५७८ रुपये काढून घेण्यात आले. आहेर यांच्या तक्रारीन्वये सायबर पोलिसांनी भादंवि कायदा कलम ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ड) नुसार गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ निरीक्षक देवराज बोरसे तपास करत आहेत.