धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी अमिश देवगणवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल

नाशिक – (विशेष प्रतिनिधी): सर्वधर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हजरत ख्वाजा मोईनुद्दिन चिस्ती अर्थात हजरत ख्वाजा गरीब नवाज यांना उद्देशून टीव्ही शोमध्ये अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी न्युज १८ इंडिया या चँनेलचा अँकर अमिश देवगण याच्याविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

धार्मिक तेढ निर्माण केल्याचा अमिष देवगणवर आरोप आहे. मुजाहिद मेहबूब शेख (वय ३५, रा. अश्रफ नगर, पखालरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली. १५ जुन रोजी अँकर अमिश देवगण याने न्युज १८ इंडिया या टिव्ही चँनेलवर ‘आरपार’ या कार्यक्रमात हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे धार्मिक तेढ व द्वेष भावना निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीन्वये देवगण विरुद्ध भादंवि कायदा कलम २९५, ५०२(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक पवार तपास करत आहेत.