नाशिक: कोरोना मृत्यू आकडेवारीत घोळ; जिल्हा नोडल अधिकाऱ्यांना बजावली नोटीस

नाशिकच्या कोरोना मृत्यू आकडेवारीत घोळ प्रकरणी नोडल अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत असताना आयसीएमआर पोर्टलवर मात्र मृतांच्या वाढत्या आकडेवारीने एकच खळबळ उडाली होती. या आकडेवारीच्या गोंधळाची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गंभीर दखल घेत जिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांना तत्काळ खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक

नोटीसमध्ये डॉ. पवार यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. डॉ. पवार यांच्याकडे कोरोना आकडेवारी संकलित करण्याचे काम आहे. पूर्णवेळ काम करता यावे यासाठी अन्य कोणतीही जबाबदारी दीड वर्षापासून देण्यात आलेली नाही. यासाठी आवश्यक कर्मचारी पुरवण्यात आले आहेत. आकडेवारी संकलित करताना केवळ वरिष्ठांना आकडेवारी पाठवणे हेच काम नसून ज्या विभागाची आकडेवारी तांत्रिकदृष्ट्या सुयोग्य वाटत नसेल त्यावेळी त्या विभागाच्या घटना व्यवस्थापकाला पत्रव्यवहार करून ती बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी होती.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू

मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. तसेच वाढत्या आकडेवारीबाबत वेळोवेळी सुधारण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. जिल्ह्यातील मृतांच्या संख्येच्या अद्ययावतीकरणासंदर्भात कार्यवाही केली नाही. वाढती संख्या ५०० पर्यंत असल्याची माहिती दिली होती. अद्ययावत होणाऱ्या माहितीमध्ये मृतांची आकडेवारी रोज शेकडोने वाढत आहे. एकंदरीत माहितीचे संकलन करत असताना माहितीचे स्त्रोत व्यवस्थित काम करीत असल्याची पडताळणी करणे अपेक्षित असताना तसे केल्याचे दिसून येत नाही. या विषयाबाबत वस्तूस्थितीदर्शक खुलासा दोन दिवसांत करावा. याची जबाबदारी घ्यावी व पूर्तता अहवाल तत्काळ सादर करावा, अशी नोटीस जिल्हाधिकारी मांढरे यांनी बजावली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक