नाशिकमध्ये कोरोनाचा चौथा बळी; मृत्यूपश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह

नाशिक(प्रतिनिधी):शनिवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर एका रुग्णाचा मृत्यूपश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हि व्यक्ती ५४ वर्षीय पुरुष असून समतानगर टाकळी येथील आहे. समतानगर टाकळी नाशिक येथील 54 वर्षीय पुरुष जिल्हा रुग्णालय नाशिक येथे दिनांक 22मे रोजी सकाळी 11 वाजून 40 मिनिटाला अत्यंत चिंताजनक परिस्थितीत उपचारासाठी दाखल झाले होते.

ना मधुमेह व हृदयविकार त्रास होता, यापूर्वी अपघातामुळे बऱ्याच शस्त्रक्रिया झालेल्या होत्या. दाखल होत असताना त्यांना श्वासाचा त्रास होत असल्याने, त्यांचे घशाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. सदर रुग्णावर जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या पथकामार्फत सर्व उपचार करण्यात आले. परंतु सदर रुग्णाची प्रकृती अत्यंत अस्वस्थ असल्याने त्यांनी शेवटच्या टप्प्यावर उपचारास प्रतिसाद दिला नाही. त्या दिवशी एका तासामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या घशाचे नमुन्याचा अहवाल आज दिनांक 23 मे 2020 रोजी प्राप्त झाला असून तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा रुग्णालयाचे प्र. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निलेश जेजुरकर यांनी दिली आहे.

तर सध्या जिल्हा रुग्णालयात 45 रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी 18 कोरोनाने बाधित व 27 संशयित रुग्ण दाखल आहे. त्यांच्यावर तज्ञ वैद्यकीय पथकामार्फत उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती सुधारत आहे.