खासगी रुग्णवाहिकांचे दर निश्चित; जास्त दर आकारल्यास कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): खासगी रुग्णवाहिकांसाठी अखेर भाडे निश्चित करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आपत्कालीन परिस्थितीत वापरतात येणाऱ्या खासगी रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांचे भाडे दर निश्चित करण्यात आले आहे.

यात रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार प्रतिकिलोमिटर १३ ते २३ रुपये दर निश्चित केला हे. त्यामुळे या दरानुसारच रुग्णवाहिका चालकांनी भाडेदराची कारणी करावी, जादा भाडे कारणी केली किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात ला आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाने परिपत्रक जारी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या ९ जून २०२० च्या आदेशानुसार खासगी रुग्णवाहिकांचा दर ठरवण्यात यावा, असे आदेश दिले होते.

त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने २१ जुलै २०२० च्या ठरावनुसार रुग्णवाहिका दर निश्चित केले होते. दरम्यानच्या कालावधीत इंधन तसेच वाहनांच्या इतर स्पेअरपार्टच्या दरात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ लक्षात घेता रुग्णवाहिकांची दरवाढ विचाराधीन होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रुग्णवाहिका आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका म्हणून वापरात येणाऱ्या खासगी वाहनांचा भाडेदर निश्चित करण्यात आला.

अटी व शर्ती पालन आवश्यक:
भाडेदर फक्त शासकीय कामकाजाकरिता अधिग्रहित करण्यात आलेल्या रुग्णवाहिकांना लागू असेल. किमान प्रतिदिन भाडे दर सामान्य नागरिकांना खासगी कामानिमित वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांना लागू नसेल. त्यांना अंतरानुसार भाडे लागू राहील. कमी अथवा मोफत सेवा देता येऊ शकेल. परंतु, प्रचलित भाडेदरापेक्षा जादा भाडे घेता येणार नाही. भाडेदर रुग्णवाहिकेत लावणे बंधनकारक असणार आहे.

मारुती व्हॅन, इको वातानुकूलित २५ किमी अथवा २ तासाकरिता ६०० रुपये, प्रतिदिन २४ तास १२०० आणि प्रति किमी १३ रुपये.
टाटा सुमो, जीपसदृश बांधणी केलेल्या रुग्णवाहिका २५ किमी अथवा २ तास ७००, प्रतिदिन २४ तास १४००, प्रति किमी १४ रुपये.
टाटा ४०७, स्वराज माझदा या प्रकारची वाहने २५ किमी अथवा २ तास ९२०, प्रतिदिन २४ तास १८५० आणि प्रति किमी १५ रुपये.
आयसीयू कार्डियाक व्हॅन २५ किमी अथवा २ तास ११५०, प्रतिदिन २४ तास २३०० आणि प्रति किमी २३ रुपये.

प्रचलित दरानुसार करा आकारणी
रुग्णवाहिकांसाठी भाडेदर निश्चित करण्यात आला आहे. यानुसार रुग्णवाहिकाचालकांनी भाडे आकारणी करावी. तसेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या अटी व शर्तींचे तंतोतंत पालन करावे. नियमापेक्षा जादा दर आकारल्यास नागरिकांनी mh15@mahatranscom.in या मेल आयडीवर वाहनांच्या नंबरसह तक्रार करावी. – भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी