धक्कादायक: नाशिक शहरात रविवारी एकूण 12 पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक(प्रतिनिधी):शहरात रविवारी (दि. २४ मे) एकूण बारा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सायंकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या अहवालात दोन तर रात्री पावणे आठ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात शहरातून दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक शहरासाठी ही बाब चिंताजनक आहे. लॉकडाऊनच्या शिथीलतेमुळे एकीकडे रस्त्यावरची गर्दी वाढतेय आणि दुसरीकडे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण !

सायंकाळी सात प्राप्त झालेल्या अहवालानुसार अजून दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हे दोन्ही रुग्ण राणा प्रताप चौक (सिडको) येथील आहेत. यात ३१ वर्षीय महिला आणि ६९ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर हे दोन्ही रुग्ण याआधी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील असल्याचे समजते.

तर रात्री पावणे आठ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात शहरातून १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात वडाळागावच्या मुमताज नगर येथील १६ वर्षीय मुलगा, ७२ वर्षीय पुरुष आणि १८ वर्षीय मुलगी, ४२ वर्षीय पुरुष, १५ वर्षीय मुलगी, लेखानगर येथील ८ वर्षीय मुलगी, २ वर्षीय मुलगी, १० वर्षीय मुलगा तर कॉलेजरोडच्या निर्माण व्हिला येथील १७ वर्षीय मुलगी आणि २३ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.