बँकांच्या एटीएममध्ये सँनिटायझरच नाहीत; ग्राहकांचं आरोग्य धाब्यावर

जागतिक पातळीवर कोरोनाव्हायरसचा फैलाव होत असतांना, नाशिकमध्ये मात्र नियमांची पायमल्ली होताना दिसतेय. कोरोना विषाणूची लागण राज्यातील काही भागात झाली आहे सदर रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासाठी शासनाने राज्यभरात अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका क्षेत्रात महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असताना शहरातील विविध बँका व एटीएम येथेही नियोजन करण्याच्या सूचना विविध बँकांना व त्यांच्या व्यवस्थापकांना नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्राद्वारे महापालिकेच्या वतीने  देण्यात आल्या आहेत.

सर्व बँकांनी आपल्या बँकांचा व एटीएमच्या दर्शनी भागावर दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक व व्हाट्सअँप क्रमांक ठळक जागी लावावेत.तसेच प्रत्येक ग्राहक किमान ५ फुटांचे सामासिक अंतर (सोशल डिस्टन्स)ठेवून बँक व एटीएम मध्ये व बाहेर मार्किंग करावे.बँक एटीएम येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वतः हँड ग्लोज वापरावेत.प्रत्येक बँक एटीएम मध्ये प्रवेश करताना बँकेमार्फत सँनिटायझर उपलब्ध ठेवावे. रांगेतील प्रत्येक व्यक्तीस हातावर सँनिटायझर टाकल्यानंतर बँकेत अथवा एटीएम येथे येण्यास परवानगी द्यावी. ज्या बँक व एटीएम मध्ये जास्त गर्दी होते अशा बँकांनी बँकेबाहेर गर्दी नियंत्रणासाठी स्वतःचे पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत. तसेच या नियोजना नुसार बँकांनी कामाचे तास व बँक बंद अथवा चालू ठेवण्याची वेळ याबाबत नियोजन करावे.तसेच आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे उलटपक्षी त्यांनी जास्तीत जास्त वेळ बँक एटीएम उघडे ठेवून नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे आवाहन मनपाच्या वतीने मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्राद्वारे केले आहे.

मात्र बँकांनी या सँनिटायझरच्या मुद्द्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. नाशिकमध्ये असे अनेक एटीएम आहेत, जिथे सँनिटायझर नाहीत. ना याबद्दल तिथल्या सुरक्षारक्षकांना कुठली माहिती आहे. लोक, भाजीपाला, दुध घेण्यासाठी बाहेर पडतात तेव्हा ते आधी एटीएममध्ये जातात. चीनच्या वूहान शहरात जो संसर्ग वाढला त्याला तिथल्या बिल्डींगच्या लिफ्ट सुद्धा कारणीभूत ठरल्या होत्या. अनेक लोकांचे हात त्या लिफ्टच्या बटणाना लागत होते, तीच परिस्थिती नाशिकच्या एटीएम ची आहे. अनेक लोक एटीएम चा वापर करताय, पण तिथे सँनिटायझरच नाहीत. महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत कडक कारवाई करावी अशी मागली नागरिक करत आहेत.