कोरोना व्हायरस मॅप उघडू नका अन्यथा…

संपूर्ण जगात थैमान घातलेला कोरोनाचा आता भारतातही शिरकाव झाला आहे. रोजच्या रोज माध्यमांमधून याबाबत बातम्याही येत आहेत. गेल्या महिन्याभरापासून काही लिंक्स सोशल मिडीयावर फिरत आहेत आणि त्यात कोरोना व्हायरस मॅप अशीही एक लिंक आहे. ज्यात देश आणि शहर निहाय कोरोना व्हायरस बद्दल माहिती दिली जातेय. पण हि लिंक म्हणजेच हा मॅप न उघडण्याचे आवाहन आता सायबर पोलिसांनी केलं आहे.. कारण हे तुमच्यासाठी धोकेदायक ठरू शकते…जाणून घ्या या मागचं कारण…

करोना व्हायरसची माहिती ऑनलाइन शोधणाऱ्या अनेकांना सायबर चोरट्यांनी दणका दिला आहे. ‘करोना विषाणूची माहिती ऑनलाइन शोधताना करोना व्हायरस मॅप उघडणाऱ्या काही जणांच्या संगणकातील माहिती व विविध पासवर्ड चोरीला जात आहेत. जगात कोणत्या देशात ‘करोना’चे रुग्ण अधिक आहेत, याची माहिती अनेक जण संगणकावरून घेत असल्याचे दिसून आले आहे. याचाच फायदा सायबर चोरट्यांनी घेतला आहे. त्यांनी करोना व्हायरसचा नकाशा ऑनलाइन टाकला आहे. हा नकाशा उघडताच संगणकातील माहिती सायबर चोरटे काढून घेत आहेत. त्यात पासवर्डसह डेटाही चोरला जात आहे. यामुळे करोना व्हायरस मॅप हा नकाशा कोणीही उघडू नका किंवा डाउनलोडही करू नका, असे आवाहन पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुधाकर काटे यांनी केले आहे.