सराफ व्यावसायिकाचा खून करून दागिने लुटणाऱ्याला नाशिकरोडहून अटक !

नाशिक (प्रतिनिधी): बीडमधील शिरूर कासार येथील एका युवकाचे अपहरण करत त्याच्याजवळ असलेले ११ तोळे सोन्याचे दागिने आणि ४ किलो चांदी असे सुमारे आठ लाखांचे दागिने लुटून त्या युवकाचा खून करत मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या सराफी कारागिराला गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक शहरात अटक केली. ज्ञानेश्वर ऊर्फ भैया गायकवाड असे या संशयिताचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने नाशिकरोडमधील अरिंगळे मळा येथे ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार कैलास कुलथे (रा. बीड) यांचा भाऊ विशाल कुलथे सराफी दुकान चालवतात. शिरूर कासार येथे राहणारा संशयित ज्ञानेश्वर गायकवाड यास दुकानात सोने-चांदीचे दागिने बनविण्यासाठी ऑर्डर दिली होती. २० मे रोजी सायंकाळी विशाल कुलथे हे संशयित गायकवाड याच्याकडे दागिने देण्यासाठी गेले होते. यानंतर ते परत आले नाही. या घटनेबाबत शिरूर कासार पोलिस ठाण्यात भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार कैलास कुलथे यांनी दिली होती. शिरूर कासार येथे परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण बघून संशयित ज्ञानेश्वर गायकवाड याच्या दुचाकीवर बसून गेल्याचे निदर्शनास आले.

तपासात विशाल कुलथे यांना मारहाण करत आठ लाख ३७ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटून जिवे ठार मारुन मृतदेह बहातपूर (ता. शेवगाव, बीड) येथे पुरला असल्याचे बीड पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्यातील मुख्य संशयित गायकवाड हा नाशिक येथे वास्तव्यास असल्याची माहिती उपायुक्त संजय बारकुंड यांना मिळाली. पथकाने अरिंगळे मळा येथे सापळा रचून संशयित गायकवाडला अटक केली. वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ, रघुनाथ शेगर, रवींद्र बागूल, नाझीम पठाण, दिलीप मोंढे, विशाल काठे, फय्याज सय्यद, महेश साळुंके, असिफ तांबोळी, विशाल देवरे यांच्या पथकाने संशयिताला अटक केली. संशयित पत्नीसह येथे वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले.