दीर्घ कालावधीसाठी वीज पुरवठा खंडित होऊ शकतो- महावितरण

नाशिक (प्रतिनिधी): निसर्ग चक्रीवादळाने जर नाशिक शहराला तडाखा दिला तर दीर्घ कालावधीसाठी वीज पुरवठा खंडित होऊ शकतो असे महावितरणने स्पष्ट केले आहे. पावसाची तीव्रता तसेच हवेचा वेग बघून, अति उच्च दाब वाहिन्या तातडीने बंद करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. याबाबत महावितरणने एका नाशिक कॉलिंगला सविस्तर माहिती दिली आहे.

अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले, दिनांक 3 व 4 जून 2020 रोजी येणाऱ्या अति तीव्र चक्रीवादळामध्ये महावितरण कंपनीच्या मालमत्तेस मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळादरम्यान विजेचे खांब तसेच वीज वाहिन्या कोसळण्याची शक्यता आहे . त्यामुळे वादळानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यास वेळ लागू शकतो. यादरम्यान दीर्घ कालावधीसाठी वीज पुरवठा खंडित होऊ शकतो.

महावितरणने या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा तयार ठेवली असून, सर्व अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार व त्यांची यंत्रणा या वादळानंतरच्या परिस्थितीशी मुकाबला करायला तयार आहे. वादळाच्या तिव्रतेवर होणारे नुकसान अवलंबुन असणार आहे व त्यानुसार विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. त्यामुळे कृपया पॅनिक होऊ नये. हवेचा वेग बघून , अति उच्च दाब वाहिन्या तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. सर्व हॉस्पिटलच्या प्रशासनानेही त्याची पर्यायी व्यवस्था त्वरित करून ठेवावी असेही सांगण्यात आले आहे.

विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यास पुढीलप्रमाणे प्राधान्य देण्यात येईल.

अती-उच्च दाब वाहिन्या सर्व प्रथम चालू केल्या जातील. त्यानंतर उपकेंद्रे चालू केले जातील. त्यानंतर टप्प्या टप्प्याने उच्च दाब वाहिन्या (11 kV ) सुरू होतील. साहजिकच या वाहिन्या सर्व शहरातून फिरलेल्या असल्यामुळे , त्यावरील दुरुस्ती करून, झाडे काढून, संरक्षित करून मग त्या चालू केल्या जातील.

उच्च दाब वाहिन्या सुरू करताना सर्व प्रथम प्राधान्य पाणीपुरवठा योजना/दवाखाने असणाऱ्या वाहिन्यांना देण्यात येईल. त्यानंतर लघुदाब वाहिन्या टप्प्या टप्प्या ने सुरू करण्यात येईल. वरील सर्वं कामे एकत्रितपणे सर्व भागात करण्यात येतील. त्यामुळे काही भागात लवकर तर काही ठिकाणी उशिरा अशा प्रकारे विद्युत पुरवठा वाहिन्यांना झालेल्या नुकसानावर अवलंबून असेन. 

महावितरणचे सर्व अधिकारी कर्मचारी हे एकमेकांच्या संपर्कात असतील त्यामुळे कृपया वारंवार फोन करून त्यांचे मनोबल कमी करू नये, अशी विनंतीही महावितरणने नागरिकांना केली आहे.