MSEDCL: रंजना पगारे झाल्या नाशिक परिमंडळाच्या पहिल्या महिला अभियंता….

नाशिक (प्रतिनिधी) : महावितरणच्या नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदी मुख्य कार्यलयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या रंजना पगारे यांनी आज (दि. २० ऑगस्ट) प्रभारी मुख्य अभियंता संजय खंडारे यांच्याकडून मुख्य अभियंता पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी त्या रत्नागिरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता या पदावर कार्यरत होत्या. नाशिक परिमंडळाच्या त्या पहिल्या महिला मुख्य अभियंता आहेत.

मूळच्या नाशिकच्या रहिवासी असलेल्या महावितरणमध्ये रंजना पगारे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी विविध महत्वाच्या पदावर काम केले आहे. चांदवड विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून विद्युत मंडळामध्ये सेवेची सुरुवात त्यांनी केली. त्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदी नाशिक शहर व चांदवड येथे सेवा दिली. यानंतर अधिक्षक अभियंता म्हणून मुख्य कार्यालय तथा नाशिक परिमंडळात पायाभूत आराखडा येथे त्यांनी सेवा दिली आहे. मुख्य अभियंता म्हणून मुख्य कार्यलयात खरेदी विभाग व वितरण या सोबतच एकलहरे येथील प्रशिक्षण व सुरक्षा केंद्रात मुख्य महाव्यवस्थापक म्हणून कार्य केले आहे. त्या नाशिक परिमंडळात येण्यापूर्वी रत्नागिरी परिमंडळ येथे कार्यरत होत्या. त्या आज सकाळी रुजू झाल्यानंतर अधीक्षक अभियंते,  कार्यकारी अभियंते, विविध विभाग प्रमुख, सर्व संघटना यांनी त्याचे स्वागत केले. परिमंडळातील ग्राहकांना अखंडित सर्वोत्कृष्ठ सेवा देण्याबरोबर विविध योजनांची गतिमान अंमलबजावणी करणे हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.